सांगली : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकरांना सर्वात मोठी ऑफर भाजपने दिली होती. मात्र त्यांनी ती नाकारली, असा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी धनगर समाज मेळाव्यात केला.
धनगर समाजाला सर्वाधिक न्याय भाजपने दिला आहे. महादेव जानकर, विकास महात्मे यांच्यासारख्या नेत्यांना केवळ भाजपनेच संधी दिली आहे. आजपर्यंतची सर्वात मोठी ऑफर गोपीचंद पडळकरांना दिली होती, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता ते अन्याय झाल्याचे सांगत आहे. ही बंडखोरी कशासाठी? धनगर समाजानेच आता पडळकरांना समजावून सांगावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
पडळकरांना भाजपने नेमकी काय आणि कधी ऑफर दिली होती, याचा खुलासा चंद्रकांतदादांनी केला नाही. मात्र ही कथित आॅफर पडळकरांनी भाजपच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करू नये म्हणून दिली होती का,अशी चर्चा सुरू झाली आहे.सर्व जाती-धर्मांना सामावून घेत पक्षाची वाटचाल सुरू आहे. अशावेळी समाजघटकांनी, पक्षाकडून काय मिळाले यावर विचार करावा. कोणीही जातीवरून दिशाभूल करीत असतील, तर त्यांना आता समजावून सांगण्याची गरज आहे.
कोणत्याही समाजाचे एकगठ्ठा मतदान कोणत्याही पक्षाला पडत नाही. त्यामुळे आम्हीसुद्धा तसा दावा करणार नाही. समाजातील महिलांना घरगुती उद्योग उभारणीबाबत, निवडणुका संपल्यानंतर योग्य धोरण आखण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
भाजप-शिवसेना युतीने सामान्य लोकांना मोठ्या पदांपर्यंत नेले. नारायण राणे पूर्वी फूटपाथवर झोपत होते. त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचविले. अशी संधी युतीशिवाय कोणतेही सरकार देऊ शकत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.