रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर महाड कोर्टाकडून राणेंना जामीन मंजूर झाला होता. तसेच, राणेंना ३० ऑगस्ट रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, नारायण राणेंची प्रकृती ठिक नसल्याने आज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे हजेरी लावता येणार नाही, असा अर्ज राणे यांचे वकिल अॅड. सचिन चिकणे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दयानंद गावडे यांच्याकडे सादर केला आहे. तर, आलेला अर्ज संबधित तपास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल आणि याबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दयानंद गावडे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेच्यावेळी महाड येथे २३ ऑगस्ट रोजी एका पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर नारायण राणे यांच्याविरोधात महाडसह नाशिक, औरंगाबाद, पुणे आदी ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. महाड शहर पोलीस ठाण्यात राणे यांच्यावर भा.दं.वि. क. १५३/२०२१ अ (१) (ब), (क), १८९, ५०४, ५०५ (२), ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांना महाड येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र राणे यांना जामीन मंजूर करताना पुराव्यांमध्ये छेडछाड करण्यात येणार नाही, या प्रकरणातील संबंधितांना, साक्षीदारांना धमकावू नये, ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी अलिबाग येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत हजेरी लावावी, तपास यंत्रणेला सहकार्य करावे, आदी अटी न्यायालयाने घातलेल्या आहेत.
त्याप्रमाणे नारायण राणे सोमवारी सकाळी येथील रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्यासमोर उपस्थित रहाणार होते. परंतु प्रकृती ठिक नसल्याने राणे हजर राहू शकणार नाहीत, असा अर्ज सादर करण्यात आला आहे, त्यामुळे राणे हजर राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नारायण राणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजेरी लावण्यासाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर दहा अधिकाऱ्यांसह सुमारे १०० पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आले आहे.