ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - काँग्रेसचे आक्रमक नेते आणि मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे नारायण राणे मुंबईतील काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याचे वृत्त आहे. गुरुदास कामतांपाठोपाठ नारायण राणेंनीही हा निर्णय घेऊन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कारभारावर नाराजी प्रगट केली आहे.
सर्व राजकीय पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीमध्ये गुंतलेले असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत गटातटांच्या राजकारणाला ऊत आला आहे. मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी संजय निरुपमांवर टीका करताना निवडणूक प्रक्रियेतून अंग काढून घेतले.
त्यानंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी कामतांच्या नाराजीची दखल घेत हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांना मुंबईत पाठवले. हुड्डा यांनी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केल्या पण नारायण राणेंच्या निर्णयावरुन नाराजी दूर झाली नसल्याचे संकेत मिळाले आहेत. हे वाद असेच सुरु राहिले तर, पालिका निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला जबर फटका बसू शकतो.