मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे लवकरच आत्मचरित्र लिहिणार आहेत. नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच टविटच्या शेवटी 'अब आएगा मजा, सबका हिसाब होगा'' असे सांगत नितेश राणे यांनी नारायण राणेंच्या आत्मचरित्रामधून अनेक धक्कादायक गौप्यस्फोट होणार असल्याचे संकेतच दिले आहेत.
एक सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा प्रवास नारायण राणे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिकाही प्रभावीपणे बजावली होती. तसेच शिवसेनेमध्ये मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच महसूल तसेच उद्योग मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर गतवर्षी नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. तसेच ते भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान, आता नारायण राणे हे आत्मचरित्र लिहिणार असल्याने त्यांच्या जीवनातील अनेक अप्रकाशित पैलू समोर येणार आहेत. तसेच विविध राजकीय उलथापालथींवेळी नेमके काय झाले होते, याबाबत अद्याप समोर न आलेले धक्कादायक गौप्यस्फोटही होण्याची शक्यता आहे.