चिपळूण, दि. 7 - माजी मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये न जाता त्यांनी काँग्रेसमध्येच राहावे. त्यांना भाजप संधी देईल, असे वाटत नाही. त्यामुळे पक्षात राहून पक्षाचे एकजुटीने काम करावे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे प्रतिपादन खासदार हुसेन दलवाई यांनी चिपळूण येथे केले.चिपळुणातील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात आज (शनिवारी) जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार दलवाई यांनी भाजप व मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच येणा-या तीन ते चार महिन्यांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची कोकणामध्ये जाहीर सभा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी अंतर्गत वादविवाद बाजूला ठेवून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माझी नेमणूक जिल्हा प्रभारी म्हणून केली आहे. आपण कोकणामध्ये पक्ष वाढविण्यासाठी आलो आहोत, पक्षामध्ये फूट पाडण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे पक्षाचे पुन्हा संघटन करणे गरजेचे आहे. भाकरी परतायची आहे. काल काय घडले, हे बघण्यापेक्षा उद्या काय घडवायचे आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काँग्रेस संकटात नाही, तर देशच संकटात आहे. या बैठकीची प्रस्तावना करताना अशोक जाधव यांनी आपल्या भाषणात माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांच्यावरच टीका केली. त्यामुळेच पक्षांतर्गत वाद झाल्याचा आरोप त्यांनी केला.
नारायण राणेंना भाजप संधी देणार नाही, त्यांनी काँग्रेसमध्येच रहावे - हुसेन दलवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2017 9:48 PM