मुंबई - कोकणातील दिग्गज नेते आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. ते 1 सप्टेंबर रोजी भाजपामध्ये प्रवेश करतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र राणेंचा भाजपाप्रवेश हा अद्यापतरी वेटिंगवरच असल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराणय राणें यांच्या भाजपाप्रवेशाबाबत भाष्य करताना शिवसेनेला विश्वासात घेऊनच राणेंच्या भाजपाप्रवेशाबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे नारायण राणे हे भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असले तरी त्यांचा भाजपाप्रवेश अजूनही अधांतरी असल्याचेच समोर येत आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याचे वृत्त काल आले होते. स्वत: राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना तसे संकेत दिले होते. मात्र नारायण राणे यांना भाजपामध्ये प्रवेश दिल्यास राणेंशी कट्टर शत्रुत्व असलेली शिवसेना नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणेंच्या पक्षप्रवेशाबाबत शिवसेनेच्या कलाने निर्णय घेण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याचे वृत्त काल आले आहे. छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येत असताना भाजपने नारायण राणे यांना जवळ करून शह-काटशहाचे राजकारण केले आहे.
नारायण राणेंचा भाजपाप्रवेश अद्याप वेटिंगवरच, मुख्यमंत्र्यांनी सांगितले हे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 8:43 PM