सावंतवाडी, दि. 20 : काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. राणे यांचा भाजपा प्रवेश निव्वळ औपचारीकता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. पण बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाबद्दलचा निर्णय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा घेतील असे आज स्पष्ट केले आहे. नारायण राणे यांच्या भाजपातील प्रवेशामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नाही. राणेंच्या पक्षप्रवेशाची कोणतीही डेडलाईन ठरली नाही. एक कतृत्ववान माजी मुख्यमंत्र्या बाबतचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. तो देशपातळीवर होईल असे चंद्रकांत पाटील यांनी सिंधुदूर्गमध्ये स्पष्ट केलं. पुढे बोलताना ते म्हणाले, की नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला तर आनांदच आहे. तसेच मला कधी ही सार्वजनिक बांधकाम मंत्री पदाची आशा नाही. त्यामुळे या पदासाठी राणे यांची कोणतीही अट नसल्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी गणेश चतुर्थी पूर्वी सिंधुदूर्गमधील महार्गाची पाहाणी सुरू केली. पाहणीला सुरुवात आंबोलीतून करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सावंतवाडी येथे पत्रकाराशी संवाद साधला.
नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तरच निश्चितच कोकणात भाजपाला फायदा होईल पण मंत्रिमंडळात त्यांचे स्थान काय असेल हा प्रश्नच आहे. कारण राणेंचा एकूणच स्वभाव लक्षात घेता ते कमी महत्वाच्या खात्यावर समाधानी होणार नाहीत असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले.
कोकणात देवगड वगळता भाजपाची फारशी ताकद नाही. राणे यांच्या प्रवेशाने भाजपाला तिथे बळ मिळेल. सत्तेचे बळ मिळाले तर, राणेंमध्ये थेट शिवसेनेला अंगावर घेण्याची क्षमता आहे. त्यामुळेच राणेंना पक्षात प्रवेश देण्याचा गांर्भीयाने विचार सुरु आहे. सध्या कोकणात शिवसेनेचे वारे असले तरी, अलीकडच्या काळात राणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने इथे ब-यापैकी यश मिळवले आहे.
राणेंचे सुपूत्र नितेश राणे कणकवलीचे आमदार आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांना पराभव स्विकारावा लागला. पाठोपाठ विधानसभेत नारायण राणेंचाही कुडाळमधून पराभव झाला होता. काही महिन्यांपूर्वी नारायण राणे यांनी अहमदाबादमध्ये जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची दृश्ये समोर आली होती. पण त्यावेळी राणे यांनी आपण खासगी कामासाठी गुजरातला गेलो होतो असे सांगून भाजपाप्रवेशाचे खंडन केले होते.
अहमदाबादला गेलो पण...
चार महिन्यांपूर्वी नारायण राणे यांनी अमित शहांची भेट घेतल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. मी काल माझ्या खासगी कामासाठी अहमदाबादला गेलो होतो पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतलीच नाही", असा खुलासा नारायण राणे यांनी गुरुवारी केला. मुख्यमंत्री फडणवीस आणि नारायण राणे स्कॉर्पिओ गाडीतून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी एकत्र दाखल झाले असे वृत्त एबीपी माझाने दिले होते. पण नारायण राणे यांनी अशी कुठलीही भेट झाल्याचे फेटाळून लावले आहे.
टीव्हीवर दाखवण्यात येत असलेल्या दृश्यांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. जे फुटेज आहे त्यामध्ये गाडीचा क्रमांक किंवा अमित शहांच्या शेजारी बसल्याचा कुठला फोटो आहे का ? असा सवाल त्यांनी केला. मी दोनवेळा मुख्यमंत्र्यांसोबत विमानातून प्रवास केला पण त्याचा राजकारणाशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
मी माझ्या रुग्णालयाच्या कामासंदर्भात अहमदाबादला गेलो होतो असे नारायण राणे यांनी सांगितले. मी संघर्ष यात्रेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये सहभागी झालो. त्यामुळे काँग्रेसमधूनच माझ्या पक्षबदलाच्या चर्चा पसरवण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले. दिल्लीला जाऊन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली पण माझ्या तक्रारीचे निवारण झाले नाही असे नारायण राणे यांनी सांगितले.