मुंबई : काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर एखाद्या पक्षात प्रवेश करणे किंवा स्वत:चा नवा पक्ष काढणे, असे दोन पर्याय होते. त्यातील दुसरा पर्याय मी निवडला आहे, असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नव्या पक्षाची घोषणा केली. शिवसेनेवर बोचरी टीका करत उद्धव ठाकरे हेच मुख्य लक्ष्य असतील, असेही राणेंनी स्पष्ट केले.‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या माझ्या पक्षाची राज्यघटनेशी अविचल बांधिलकी असेल. लवकरच पक्षाची नोंदणी करून झेंडा आणि निशाणी जाहीर करू. ‘सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठीच आम्ही राजकारण करू आणि दिला शब्द पाळू’ हेच आमचे ब्रीदवाक्य असेल, असेही राणे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील पत्रकार परिषदेत सांगितले.शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत राणेंनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे ‘कुजके-नासके विचार’ होते, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव आणि शिवसेनाच आपले राजकीय विरोधक असतील, असे राणे म्हणाले. जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करता, मग सत्तेत गेलातच कशाला? काश्मीर आणि बिहारमध्ये भाजपा सत्तेसाठी लाचार झाल्याचा आरोप करणाºया उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लाचारी का पत्करली, असे सवालही राणे यांनी केले.महत्त्वाचे प्रश्न...रालोआत जाणार का?- आताच पक्ष काढला आहे. निमंत्रण आले तर जाऊ, असे उत्तर राणे यांनी दिले.किती आमदार येणार?- आताच दुकान उघडल्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्ष दुकान उघडल्यावर कळेलच. त्यांची कमतरता नाही, असे राणे म्हणाले.राज्यात संमिश्र प्रतिक्रिया : राणे यांनी नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांनी आतषबाजी करीत जल्लोष केला. तर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली. भ्रष्टाचारवाल्या राणेंना शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार नाही, असे खैरे म्हणाले. तर, दिल्लीपर्यंत भीक मागूनही राणेंचे हात रिकामेच असल्याची टीका खा. विनायक राऊत यांनी केली.
नारायण राणेंचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान’, शिवसेना हेच मुख्य लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 5:07 AM