लाखोंच्या संख्येने मराठा आरक्षण आंदोलक मुंबईच्या वेशीवर आलेले असताना राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या तेराही मागण्या मान्य केल्या आहेत. यामध्ये आंदोलकांवरील गुन्हे, सगेसोयऱ्यांना आरक्षण आदी मुद्दे आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला फसविल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. अशातच केंद्र सरकारचे मंत्री आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या भाजपाचे नेते नारायण राणे यांनी या आरक्षणाच्या मसुद्याला विरोध दर्शविला आहे.
नारायण राणे यांनी ऑक्टोबरमध्ये मराठा समाजाला कुणबींचे आरक्षण देण्यास विरोध केला होता. राज्य सरकारला एखाद्या जातीला आरक्षण द्यायचे असेल तर त्यासाठीच्या घटनात्मक तरतुदी काय आहेत याचाही जरांगे यांनी अभ्यास करावा. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. ९६ कुळी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नको आहे. मी देखील मराठा आहे आणि मला कुणबी प्रमाणपत्र नको आहे. जरांगे म्हणतात तसे मराठा आणि कुणबी एकच आहेत असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे राणे म्हणाले होते. यावरून जरांगे यांनी राणेंना प्रत्यूत्तर दिले होते.
राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज आरक्षण मागत आहेत. कुणबी घेण्याला काही वाईट नाही, कुणबी म्हणजे शेती, आमचा बाप शेती करतो मग तो श्रीमंत मराठा असला तरीही शेती करतो. जे जमिनीवर राहणार नाहीत, मायभूमीत राहणार नाहीत त्यांनी आरक्षण घेऊ नये, असे जरांगे म्हणाले होते. यानंतर राणेंनी फारवेळा मराठा आरक्षणावर आपली प्रतिक्रिया दिली नव्हती.
आज राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मसुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन, असे राणे म्हणाले आहेत.