सिंधुदुर्ग/मुंबई - नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होणार आहे. नारायण राणेंनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या नारायण राणेंनी काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर १ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. त्यानंतर या पक्षाची आगामी वाटचाल आपण लवकरच जाहीर करू, अशी भूमिका राणे यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. त्यानुसार गुरूवारपासून सिंधुदुर्ग दौºयावर आलेल्या नारायण राणे यांनी शुक्रवारी कुडाळ तालुक्यातील पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केल्यापासून त्यांचा पक्ष एनडीएमध्ये दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर आज राणेंनी आपला पक्ष एनडीएमध्ये सहभागी होत असल्याची घोषणा केली. त्यावेळी आमदार नितेश राणेंसह अनेक आमदार आपल्या पक्षात येतील, असा दावा केला. मात्र मंत्रिपदाबाबत विचारले असता, आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच ग्रामपंचायत निवडणुकींत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे 29सरपंच बिनविरोध निवडून आल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.नीतेश राणेंसह अन्य आमदारही सामिल होतीलआपण एनडीएला पाठिंबा दिला असून आता आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि भाजप पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील. असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच स्वाभिमान पक्षात आमदार नीतेश राणेंसह राज्यातील अनेक आमदार सामिल होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्वाभिमानचे २९ सरपंच बिनविरोधआपण स्थापन केलेल्या नव्या स्वाभिमान पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ सरपंच बिनविरोध निवडून आल्याचे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या कोणत्याही पक्षाचा अजून एकही सरपंच निवडून आलेला नसताना केवळ स्वाभिमान पक्षाचे २९ सरपंच निवडून आल्यामुळे आपली विजयी पताका रोवण्यात आली आहे. आगामी काळात स्वाभिमान पक्ष असेच उज्वल यश संपादन करेल.राणे यांनी काँग्रेसमध्ये असतानाच समर्थ विकास पॅनेलचे स्थापना केली आहे. या पॅनेलच्या माध्यमातून राणे समर्थक सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जात आहेत. गुरूवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. या दिवसापर्यंत सिंधुदुर्गात निवडणुका होत असलेल्या ३२५ ग्रामपंचायतींपैकी २९ ठिकाणचे सरपंच हे समर्थ विकास पॅनेलकडून बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे राणेंच्या स्वाभिमान पक्षाला सिंधुदुर्गातून यश मिळण्यास सुरूवात झाली आहे. असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याबाबत आपल्याकडे विचारणा केल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली होती. मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास नारायण राणे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रालोआत येण्याबाबत विचारले. मात्र, माझा निर्णय दोन दिवसात त्यांना कळवणार असल्याचे म्हटले होते. त्याप्रमाणे शुक्रवारी राणेंनी रालोआमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली.