केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राज्यसभेची उमेदवारी न दिल्याने त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी भाजपा देणार अशी अटकळ बांधली गेली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन महिना उजाडला तरी या मतदारसंघात अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. याचे कारण म्हणजे या मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत मोठी तयारी करून बसले होते. आज याच किरण सामंत यांनी लोकसभा निवडणुकीचे चार अर्ज घेऊन ठेवल्याने दोन्ही जिल्ह्यांच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
येत्या काही दिवसांत राणे किंवा सामंत यावरून पडदा हटणार आहे. परंतु, सामंत यांनी रविवारी नागपूरला जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. या भेटीत काय चर्चा झाली हे सामंत यांनी सांगितले होते. तसेच हा मतदारसंघ शिवसेनाचा असून तो आम्हालाच मिळाला पाहिजे असे फडणवीसांना सांगितल्याचे ते म्हणाले होते. भाजपच्या चिन्हावर लढणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यामुळे तिथे धनुष्यबाणच चालणार इतर कोणतेही चिन्ह नाही, असे आपण फडणवीसांना सांगितल्याचे ते म्हणाले होते.
यामुळे राणेंना डावलून सामंतांना उमेदवारी मिळण्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. अशातच किरण सामंत यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत. दुसरीकडे नारायण राणे सिंधुदुर्गमध्ये लोकांच्या गावागावात जाऊन गाठीभेटी घेत आहेत. यामुळे राणेंना उमेदवारी मिळणार की सामंतांना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नारायण राणे यांनी देखील चार अर्ज घेतले आहेत.
महायुतीचे जे कोण उमेदवार असतील त्यांचेच काम करायचे आहे, हे सत्य आहे. आम्हाला तसे आदेश आहेत. थोड्या दिवसांमध्ये प्रचार करणे जिकीरीचे आहे. खूप मोठा मतदार संघ आहे. जर किरण सामंत यांचे नाव जाहीर झाले, तर तयारी असावी या अनुषंगाने फॉर्म घेतले आहेत. इकडची उमेदवारी शिवसेनेलाच मिळावी हा आमचा हक्क आहे. आमचे सगळे प्लॅनिंग तयार आहे. किरण सामंत कोणत्याही प्रकारे अपक्ष उमेदवारी करणार नाहीत, असे रत्नागिरीचे शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी म्हटले आहे.