मुंबई, दि. 17 - गेल्या काही काळापासून नाराज असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नवरात्रौत्सवातच मोठी घोषणा करण्याचे सुतोवाच केले आहेत. आपल्याला विश्वासात न घेता सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी नेमण्यात आल्याने राणे संतप्त झाले आहेत. तसेच त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्र सोडले आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राणेंनी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वावर जोरदार टीका करत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नाराणय राणे म्हणाले, काँग्रेसमध्ये गेल्यापासून जिल्ह्यातील कोणताही निर्णय घेताना मला विचारात घेतले जात असे. मात्र यावेळी कोणतीही विचारपूस न करता जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. तसेच नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे."यावेळी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वावरही राणेंनी तोफ डागली."सिंधुदुर्गात घडलेल्या घटनाक्रमामागे मोहन प्रकाश आणि अशोक चव्हाण यांचा हात आहे. या दोघांच्या षडयंत्रामुळे काँग्रेस संपवण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्हा परिषद, जिल्हा बँक काँग्रेसच्या ताब्यात असलेला सिंधुदुर्ग हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. त्याबरोबर जिल्हा नियोजन समितीत काँग्रेसचे वर्चस्व आहे, जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समित्या, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीमध्ये कांग्रेसचे वर्चस्व आहे. ज्या कार्यकर्त्यांमुळे ही सत्ता आली त्या कार्यकर्त्यांनाच घरी बसवण्याचे काम आज काँग्रेसने केले आहे." असे राणे म्हणाले. मास लिडर आहेत त्यांनाच संपवण्याचे कारस्थान काँग्रेसकडून सुरू आहे. मात्र जे लोक काँग्रेसला संपवत आहेत किंवा संपवण्याची सुपारी घेतली आहे त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसमध्ये ज्या अपेक्षेने गेलो होतो त्याबाबतीत माझी निराशा झाली. आता या सर्वप्रकरणाचा सोक्षमोक्ष मी लवकरच लावेन, अगदी नवरात्रौत्सवातच मोठी घोषणा करेन, असे सुतोवाही राणेंनी केले.
दरम्यान, नारायण राणे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. काँग्रेसने नवी कार्यकारिणी जाहीर करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर नारायण राणे प्रथमच जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या जिल्ह्यातील "एन्ट्री" कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता राणे काय भूमिका घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. सोमवारी ते कुडाळ येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या राणेंच्या भाषणाकडे कार्यकर्त्यांसह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांचा संभाव्य भाजप प्रवेश गृहीत धरून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी अखेर काँग्रेसने शनिवारी बरखास्त केली होती. कॉँग्रेसच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे प्रदेश सदस्य आणि निष्ठावंत विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त होणार याची चर्चा गेले काही दिवस सर्वत्र होती. आठवड्यापूर्वी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसचे नेते जिल्ह्यात त्यावेळी सावंतवाडीत बैठक झाली. या बैठकीत आमदार नीतेश राणे यांनी प्रदेशच्या नेत्यांना चांगलेच धारेवर धरले होते. तसेच ही बैठक ‘हायजॅक’ही केली होती.