मुंबई – शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचं सरकार ही फक्त सत्तेसाठी केलेली तडजोड आहे. शिवसेना कधीही काँग्रेसी विचाराची होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटल्याने महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजपा नेते किरिट सोमय्या यांना पाठवलेल्या नोटिशीवरुन गृहमंत्रालयाने ही कारवाई केल्याचं शिवसेनेचे संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले होते. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या कारवाईची कल्पना नव्हती का? शिवसेना-राष्ट्रवादीत विसंवाद आहे का? असं विचारलं जाऊ लागलं. त्यानंतर अनंत गीते यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीतील गटबाजी पुन्हा एकदा दिसून आली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) म्हणाले की, संजय राऊत अपवाद सोडला तर शिवसेनेच्या(Shivsena) कुठल्याही नेत्याची नार्को टेस्ट करा त्यातून एकच सत्य बाहेर पडेल ते म्हणजे शिवसेनेनं राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाणं हे राजकीय सुसाईड आहे. संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे हा पीचएडीचा विषय आहे. ते नेहमी उद्धव ठाकरेंचे कौतुक कमी शरद पवार यांचेच कौतुक जास्त करताना दिसून येतात असं त्यांनी सांगितले.
काय म्हणाले अनंत गीते?
मुख्यमंत्री आपला आहे म्हणून राज्यात सरकार आपले आहे. बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. महाविकास आघाडीचं सरकार आहे. सत्ता मविआ नेते सांभाळतील. तुमची आणि माझी जबाबदारी आपलं गाव सांभाळायचं आहे. त्यावेळी आम्हाला महाविकास आघाडीचा नव्हे तर शिवसेनेचाच विचार करायचा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांचे तोंड बघत होते का? या दोन्ही पक्षांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एकमेकांच्या विचाराचे होऊ शकत नाही मग शिवसेना काँग्रेसी विचारांची होऊ शकते का? राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिकच राहणार. आपली ओळख आपण कधीही विसरता कामा नये. आमचा नेता फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत. इतर कुणीही होऊ शकत नाही. मग त्या नेत्याने काहीही उपाधी लावू दे. मग जाणता राजा असं स्वत:ला म्हणवलं तरीही ने आमचे नेते नाहीत. गुरु नाहीत. असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते(Anant Gite) यांनी शरद पवारांना लगावला.