नाशिक : ढोलताशांचा गजर अन् लेझीम पथक, शोभायात्रेच्या अग्रभागी अश्व, आखाड्याचे निशाण यांच्यासह श्री संप्रदायाचा चित्ररथ, आखाड्याचे रथ आणि जयघोष करीत हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या कलशधारी महिला भाविक यांनी नरेंद्राचार्य महाराज यांच्या मिरवणुकीत भाग घेतला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजनगर यांच्या खालशातून रामकुंडावर मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी रामकुंडावर महाराजांनी गंगापूजन केले.मिरवणुकीत नरेंद्राचार्य महाराज, त्यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास, डाकोर इंदोर खालशाचे मंगल पीठाधिश्वर माधवाचार्य महाराज यांच्यासह तीन आखाड्यांचे रथ, चतु:संप्रदाय यांचा सहभाग होता. तसेच खालशाचे साधू-महंतही सहभागी झाले होते. आखाड्याकडून शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. नरेंद्राचार्य महाराजाचे भक्त मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. साधुग्राममधील निघालेल्या सदर मिरवणुकीने परिसरातील रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. साधुग्रामसह रामकुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
नरेंद्राचार्य महाराजांची मिरवणूक उत्साहात
By admin | Published: September 10, 2015 2:37 AM