ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता खोटे बोलत असून त्याचा प्रयत्य कल्याण-डोंबिवली निवडणुकांमध्ये नागरिकांना आला. निवडणुकीवेळी मुख्यमंत्र्यांनी विविध स्वरुपाचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र निवडणूक पार पडल्यानंतर कल्याणला पॅकेज कुठे मिळाले, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी ठाण्यात केला. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूकही जवळ आली असून यासाठी ठाण्यात येऊन अशाच प्रकारे विविध पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री करतीलही. परंतु, कल्याण-डोंबिवलीकर जसे फसले तसे ठाणेकरांनो तुम्ही फसू नका, असे आवाहन त्यांनी केले.महापालिका निवडणुकीमध्ये महापालिकेतील भ्रष्टाचारासह विविध मुद्यांवरुन प्रचार केला जाणार आहे. याशिवाय, मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदी निर्णयाचा फटका सर्वसामान्यांना बसला असून त्यामुळे हा निर्णय कसा चुकीचा आहे, त्याच्या दुष्परिणामांचाही प्रचार निवडणुकीत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेवर असली तरी दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करीत आहेत. या आरोपानंतर दोन्ही पक्षाचे नेते पुन्हा एकत्र येत आहेत. या दोन्ही पक्षांनी लज्जाहिनता दाखिवली असून हे सर्व जनतेसमोरच घडत आहे. (प्रतिनिधी)
नरेंद्र मोदींप्रमाणे मुख्यमंत्रीही खोटारडे
By admin | Published: January 03, 2017 5:38 AM