नांदेड, दि. 8 - नॅनो प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका व्यक्तीला 65 हजार कोटी दिले असा गंभीर आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. नॅनो प्रकल्पासाठी मोदी पैसे देतात पण शेतकऱ्यांना एक रुपया पण देत नाहीत असे राहुल म्हणाले. नांदेडच्या मोंढा मैदानावर राहुल गांधींची जाहीर सभा चालू आहे. राहुल गांधी आज मराठावाडा दौ-यावर आले आहे.
मागच्या तीनवर्षात महाराष्ट्रात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या असे राहुल म्हणाले. काँग्रेसच्या दबावामुळेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भाजपा सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला असे ते म्हणाले. काळ्या पैशाविरोधातील नरेंद्र मोदींची मोहीम फेल ठरली आहे. देशाचे नुकसानीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहे. 2 कोटी युवकांचा रोजगार कुठे गेला ? केवळ स्वप्न दाखवून चालणार नाही त्यांचे भविष्य दाखवा, तीन वर्षांपासून किती युवकांना रोजगार दिला ? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
सर्वात जास्त बेरोजगारी हिंदुस्थानात असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या सभेला काँग्रेसचे राज्यातील सर्व दिग्गज नेते उपस्थित आहे. महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी केंदिय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, पतंगराव कदम, माणिकराव ठाकरे, राजीव सातव यांच्यासह दिग्गज नेत्यांची व्यासपिठावर उपस्थिती आहे. फक्त नारायण राणे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून नारायण राणे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दे
- महाराष्ट्रात तीन वर्षात नऊ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या - काँग्रेस नेत्यांच्या दबावामुळे राज्य सरकारला कर्जमाफी करावी लागली - सरकारने सांगितले 35 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी केली पण प्रत्यक्षात फक्त 5 हजार कोटींची कर्जमाफी - कर्जमाफीच्या अर्जात शेतक-यांची जात विचारली जात आहे. - कर्जमाफी साठी शेतक-यांना रांगेत उभे केले - काश्मीरात दहशतवाद वाढलाय. - 90 टक्क्यापेक्षा जास्त काळा पैसा जमीन आणि सोन्यात गुंतवलेला आहे हे सा-या देशाला महिती आहे. - तरी मोदीजींची नजर शेतक-यांच्या पैशावरच कशी काय गेली- नोटाबंदीनंतर 99% टक्के पैसा परत आला, नोटबंदी सपशेल अपयशी ठरली, देशाचे आर्थिक नुकसान केले.