नवी मुंबई : देशाची अर्थव्यवस्था मोडित काढण्यासाठी मर्जीतील माणसे वेगवेगळ्या हुद्द्यावर नियुक्त केली जात आहेत. फक्त राफेलमध्येच नाही तर प्रत्येक गोष्टीत मोदी अयशस्वी झाले आहेत. राफेलचा ४० हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. या संदर्भात राहुल गांधी सातत्याने विचारणा करीत आहेत; परंतु कोणतेही उत्तर दिले जात नाही. एकूण राफेलच नव्हे, तर नरेंद्र मोदी हे सर्वच आघाड्यांवर अयशस्वी झाल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवर्तन निर्धार मेळावा शनिवार, १२ रोजी कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी भुजबळ बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मला तुरुंगात का टाकले, हे मला तर सोडाच; परंतु ज्यांनी टाकले त्यांनाही कळले नाही, असे सांगून भुजबळ यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा पाढा वाचला. तर विकास आणि वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याच्या मुद्द्यावर सत्ता काबीज केली, अशी टीका विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. अच्छे दिन म्हणजे आता चेष्टेचा विषय झाला आहे. जे देशात चाललेय त्याचे परिवर्तन करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवले आहे. केवळ पाच मंत्रिपदासाठी शिवसेनेने लाचारी पत्करत भाजपाला साथ दिली आहे. वाघाची अवस्था कुत्र्यापेक्षा भयानक झाल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. बेस्ट कामगारांना मेस्मा सारखा कायदा लावून घरे खाली करायला सांगणाºया शिवसेना आणि भाजपाला जनताच धडा शिकवेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
भाजपाबरोबर असलेले मित्रपक्ष बाजूला व्हायला लागले आहेत. पुढील निवडणुकीत भजपाचे पानिपत होणार आहे. अमित शहा यांनाही हे कळून चुकले आहे. दोन्ही पक्षांचे प्रमुख एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. एकत्र नसल्याचे नाटक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वेळी केला. माजी मंत्री गणेश नाईक यांचेही भाषण झाले. या प्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, महापौर जयवंत सुतार, आमदार शशिकांत शिंदे, प्रवक्ते नवाब मलिक, आ. संदीप नाईक, आ. हेमंत टकले, माजी खासदार संजीव नाईक, महिला अध्यक्षा चित्रा वाघ आदी उपस्थित होते.
चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाहीअहमदनगर जिल्ह्यात भाजपाला मदत केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात सर्वांचे म्हणणे एकूण घेतले गेले. चुकीच्या गोष्टींचे राष्ट्रवादी कधीही समर्थन करणार नाही, त्यामुळेच संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्यात आल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेळाव्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.