सांगली: परदेशातील बँकांमध्ये भारतीयांचा इतका काळा पैसा आहे, की तो देशात आणल्यास प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये येतील, असं नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हटलं होतं. यानंतर 15 लाख येणार कधी, असा प्रश्न गेल्या साडेचार वर्षांपासून मोदी सरकारला विचारला जात आहे. आता या 15 लाखांवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. सर्वसामान्यांच्या खात्यात हळूहळू 15 लाख येतील, असं आठवलेंनी म्हटलं आहे. ते सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये बोलत होते. 'देशातील नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, असं आश्वासन मोदींनी 2014 मध्ये देशातील जनतेला दिलं होतं. मात्र इतकी मोठी रक्कम सध्या सरकारकडे नाही. आम्ही आरबीआयकडे पैसै मागत आहोत. पण ते द्यायला तयार नाहीत. यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे हे पैसे नागरिकांना एकाचवेळी मिळणार नाहीत. नागरिकांच्या खात्यात हळूहळू पैसे जमा होतील,' असं आठवले म्हणाले. 2014 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मोदींनी त्यांच्या अनेक सभांमध्ये 15 लाखांचा उल्लेख केला होता. परदेशी बँकांमधील काळा पैसा देशात आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. 'आम्ही सत्तेत आल्यास परदेशातील काळा पैसा देशात आणू. या पैशाचं प्रमाण इतकं जास्त आहे की त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील,' असं मोदींनी अनेक सभांमध्ये म्हटलं होतं.
लवकरच सगळ्यांच्या खात्यात 15 लाख येतील- रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 12:55 PM