मोदींनी देशाशी गद्दारी केली; अण्णा हजारेंचा थेट हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 02:19 PM2019-02-04T14:19:52+5:302019-02-04T14:21:16+5:30
भाजपा सरकारनं जनतेची फसवणूक केल्याचा आरोप
राळेगणसिद्धी: लोकपालच्या आंदोलनामुळेच मोदी सरकार सत्तेवर आलं. मात्र सत्तेवर येताच त्यांना लोकपालचा विसर पडला. त्यांनी देशाशी गद्दारी केली, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मोदी सरकावर थेट तोफ डागली आहे. पाच वर्षांपूर्वी अरुण जेटली, सुषमा स्वराज लोकपालवर भरभरुन बोलत होते. मात्र आता ही सर्व मंडळी मूग गिळून गप्प आहेत, असे असं अण्णा हजारे म्हणाले. लोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारेंचं राळेगणसिद्धीत उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकपाल आंदोलनामुळे देश ढवळून निघाला. त्यामुळेच केंद्रात भाजपाची सत्ता आली. मात्र आज पाच वर्ष होऊनही त्यांना अद्याप लोकपाल नेमता आलेला नाही. ही देशाशी गद्दारी आहे, अशा तिखट शब्दांमध्ये अण्णा मोदी सरकारवर बरसले. दिलेला शब्द न पाळण्यात काँग्रेसची डॉक्टरेट, तर भाजपा ग्रॅज्युएट असल्याचंही त्यांनी म्हटलं. गेल्या पाच वर्षांपासून सरकारकडून जनतेची दिशाभूल सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री भेटीसाठी येणार होते. मात्र मीच त्यांना येऊ नका, असं सांगितलं. उगाच मंत्री येणार. त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होणार. त्यामुळे मंत्र्यांना भेटीसाठी येऊ नका, असं सांगितलं. मला आता केवळ चर्चा नको. काहीतरी ठोस निर्णय घ्या आणि मगच या, असा निरोप मंत्र्याना दिल्याचं अण्णांनी सांगितलं. 90 टक्के मागण्या मान्य झाल्याचा राज्य सरकारचा दावा खोटा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इतक्या मागण्या पूर्ण झाल्या असत्या, तर उपोषण का सुरू ठेवलं असतं? उपोषण सुरू ठेवायला मी वेडा आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.