नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार, २०१४ साली दिलेल्या गॅरंटीचे काय झाले? मल्लिकार्जून खर्गेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 05:54 PM2024-02-16T17:54:15+5:302024-02-16T17:54:45+5:30
Mallikarjun Kharge Criticize Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मोदीची गॅरंटी, मोदीची गॅरंटी असे बोलत असतात, त्यांच्या बोलण्यात मी, मी पणा जास्त असतो. आपण ‘आम्ही भारताचो लोक’ असे म्हणतो परंतु मोदी मात्र मी, मी असेच करतात. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलत असतात, ते खोट्यांचे सरदार आहेत.
लोणावळा - पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मोदीची गॅरंटी, मोदीची गॅरंटी असे बोलत असतात, त्यांच्या बोलण्यात मी, मी पणा जास्त असतो. आपण ‘आम्ही भारताचो लोक’ असे म्हणतो परंतु मोदी मात्र मी, मी असेच करतात. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलत असतात, ते खोट्यांचे सरदार आहेत. मोदींनी आजपर्यंत दिलेली एकही गॅरंटी पूर्ण केली नाही. २०१४ मध्ये मोदींनी काळा पैसा आणून प्रत्येकाला १५ लाख रुपये प्रत्येकाला देण्याची, दरवर्षी २ कोटी नोकरी देण्याची, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू, या गॅरंटी दिल्या होत्या या मोदी गॅरंटीचे काय झाले? असा सवाल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला आहे.
लोणावळ्यात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराचे उद्घाटन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी ऑनलाईन केले. यावेळी ते बोलत होते. खरगे पुढे म्हणाले की, काँग्रेसप्रणित युपीए सरकारने २००४ ते २०१४ याकाळात अन्न सुरक्षा कायदा आणला, रोजगार हमीचा मनरेगा कायदा केला, सर्व शिक्षा अभियान आणले, माहिती अधिकार कायदा आणला. मोदी सरकारने दहा वर्षात काहीही दिलेले नाही. नरेंद्र मोदी, भाजपा, आरएसएसने देशाला स्वातंत्र दिलेले नाही. काँग्रेस पक्ष, महात्मा गांधी, पंडित नेहरु, सरदार पटेल, लोकमान्य टिळक या महान नेत्यांनी देशाला स्वातंत्र मिळवून दिले. स्वातंत्र्य चळवळीत भाजपाचे काहीच योगदान नाही. काँग्रेस पक्षाचा जन्म मुंबईत झाला आहे, आज या पक्षाला १३९ वर्ष झाली आहेत. काँग्रेस पक्ष खोटे बोलणारा पक्ष नाही. लोकांच्या हितासाठी व स्वातंत्र्यासाठी या पक्षाचा जन्म झाला आहे. समाजात फुट पाडण्यासाठी काँग्रेस पक्ष नाही. एकता व सामाजिक सौहार्द जपणारा पक्ष आहे. मुंबईकडे देशाचे लक्ष लागलेले असते, मुंबई व पुणे शहराने सामाजिक सौहार्दाचे काम केले आहे. आपली लढाई मोदी व भाजपाविरोधात आहे तशीच ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थाविरोधातही लढाई करावी लागत आहे. निवडणुकीसाठी घराघरात जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवा. या निवडणुकीत सर्वांनी हिरीरीने भाग घेत एकजूट होऊन निवडणुका लढा द्या व काँग्रेसला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण काँग्रेस पक्षासाठी अनुकुल आहे. सर्व राज्याचा दौरा करून आढावा घेतल्यानंतर आता शिबीर घेतले जात आहे. महाविकास आघाडी राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवत आहेत. आजचे राज्यातील वातावरण पाहता मविआ सर्वात जास्त जागा जिंकेल. केंद्र सरकारने काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजपा कोणत्याही थराला जाईल परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढून विजय मिळवावा, असे आवाहन रमेश चेन्नीथल्ला यांनी केले.