मुंबई - राजभवन हे प्रत्येक घडामोडीचे साक्षीदार आहे. नवीन राजभवन जनतेसाठी, राज्यपालांसाठी नवीन ऊर्जा देणारं आहे. जनतेसाठी हे राजभवन नाही तर लोकभवन आहे जे लोकांच्या अनेक अपेक्षा पूर्ण करेल. मी राजभवनात अनेकदा आलोय, कित्येकदा थांबलोय. राजभवनानं स्वातंत्र्यांचा तिरंगा फडकताना पाहिला आहे. देश स्वातंत्र्याची ७५ व्या अमृतमहोत्सव साजरा करत आहे. राजभवन अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) म्हणाले.
राजभवन येथे नवीन 'जलभूषण' इमारत क्रांतिकारी गॅलरीच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण सगळे एकत्र आलो याचा आनंद आहे. स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना ही वास्तू समर्पित करताना मला आनंद होतोय. चाफेकर बंधु, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपापल्या मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. स्वातंत्र्य चळवळ लोकलही होती आणि ग्लोबलही होती. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाने जगाला प्रेरणा दिले. आत्मनिर्भर अभियानामुळे भारताला नवीन ओळख निर्माण होत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्राने राष्ट्रीय विकासात महत्त्वाची भूमिका निभावली. मुंबईचा आधुनिक विकास होत आहे. मुंबई हे केवळ स्वप्नांचे शहर नाही, तर महाराष्ट्रात अशी अनेक शहरे आहेत, जी २१व्या शतकात देशाच्या विकासाची केंद्रे बनणार आहेत. या विचाराने एकीकडे मुंबईतील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण होत आहे आणि त्याचवेळी इतर शहरांमध्येही आधुनिक सुविधा वाढवल्या जात आहेत. मेट्रो विस्तार, राज्यभरात सुरू असलेले नॅशनल हायवे पाहिले तर विकासाची सकारात्मक दृष्टी दिसते. राष्ट्रीय विकासासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. जगातील लोक आपल्यावर हसत असतील. ७५ वर्ष राजभवन इथे आहे परंतु बंकर असल्याचं अलीकडेच माहित पडले. आपल्या देशात खूप ऐतिहासिक वारसा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
दरम्यान, सामाजिक, कौटुंबिक, वैचारिक भूमिकांचा विचार न करता देशात आणि परदेशात जिथे जिथे चळवळीचे स्थान होते. प्रत्येकाचं ध्येय एकच भारताचे पूर्ण स्वातंत्र्य होते. महाराष्ट्राने देशाला अनेक क्षेत्रात प्रेरणा दिली आहे. सामाजिक क्रांतीबद्दल बोलायचे झाले तर जगतगुरू श्री संत तुकाराम महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत समाजसुधारकांचा अतिशय समृद्ध वारसा आहे. नेताजींच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद सरकार भारतीय हितासाठी समर्पित होते, पण त्याची व्याप्ती जागतिक होती. यामुळेच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीने जगातील अनेक देशांच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा दिली. आज या सागराकडे पाहून मला स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण येतेय असंही मोदी म्हणाले.