नागपूर - महायुती सरकार राज्यात सर्व आघाड्यांवर अपयशी झाले आहे.त्यामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींना वारंवार राज्यात दौरा करावा लागत असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात महायुती सरकारची कामगिरी वादग्रस्त, भ्रष्टाचाराने बरबटलेली व स्वहितासाठी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचे लक्ष राज्याच्या विकासाकडे नाही तर स्वतःचे खिसे भरण्याकडे आहे. म्हणूनच सरकारची गेलेली पत सुधारण्यासाठी मोदींना वारंवार राज्यात दौरा करावा लागत आहे.दुर्गम गडचिरोलीत काँग्रेसची विभागीय बैठक घेण्यात यावी असा विचार मांडला त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली त्यानुसार गडचिरोलीत वीस तारखेला विभागीय मेळावा होत आहे. हा मेळावा कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
१६ वर्षाच्या आतील कोणत्याही विद्यार्थ्याला यापुढे कोचिंग क्लासेसमध्ये जाता येणार नाही. या मुद्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात आणि देशात शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्या भरल्या जात नाहीत त्यामुळे आधीच अनेकजण बेरोजगार झाले आहेत. नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले बेरोजगार कोचिंग क्लासेस घेऊन आपलं कुटुंब चालवतात मात्र या निर्णयामुळे बेरोजगारांना रस्त्यावर भिक मागत ठेवण्याचा हेतू दिसतो.हे सरकार बेरोजगारांना भिकेला लावत असून यातून केंद्राची शिक्षणाप्रती अनास्था दिसून येते असे वडेट्टीवार म्हणाले.