“धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवत आहेत, राजीनाम्याची मागणी योग्यच”; महायुतीला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 23:29 IST2025-01-31T23:28:27+5:302025-01-31T23:29:40+5:30

Narendra Patil News: महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना निर्दोष सिद्ध करून एक प्रकारे क्लीन चिट दिली आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

narendra patil big claims dhananjay munde is saving walmik karad in beed case and said the demand for his resignation is right | “धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवत आहेत, राजीनाम्याची मागणी योग्यच”; महायुतीला घरचा आहेर

“धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवत आहेत, राजीनाम्याची मागणी योग्यच”; महायुतीला घरचा आहेर

Narendra Patil News: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. यानंतर महायुतीतील एका नेत्याने या प्रकरणी सरकारला घरचा आहेर दिला आहे. 

भगवान गड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. केवळ पाठीशी नाही. यात दोन भाग आहेत. जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध सुरू आहे. मला माध्यमांना एक विचारावेसे वाटते की, ज्या लोकांनी हे प्रकरण केले, निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली, हे माध्यमांनी का दाखवले नाही. कारण अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे. ती पण दखल घेण्यासारखी आहे, असे मला वाटते. त्यांचा गावातील, बैठकीतील विषय आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असे मला वाटते. गावचा मुद्दा आहे. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना. त्याच्यावर माध्यमे आक्षेप घेत आहेत. ५३ दिवस झाले मीडिया ट्रायल सुरू आहेत. यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून माणूस किंवा गुन्हेगार नाही. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवत आहात. त्याची पार्श्वभूमी ही नाही ना, असे सांगत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या यातच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवत आहेत, राजीनाम्याची मागणी योग्यच

पत्रकारांशी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की, अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या दोघांचीही मागणी योग्य आहे. आपला सहकारी किंवा पार्टनर एखाद्या प्रकरणात अडकला असेल तर, धनंजय मुंडे यांनी लगेच बाजूला व्हायला हवे होते. एवढे प्रकरण झालेले असताना धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडच्या परळी येथील कार्यालयात जाऊन गाठी-भेटी घेत आहे. याचा अर्थ धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचमुळे अंजली दमानिया आणि आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी रास्त आहे. आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. 

...तर धनंजय मुंडे यांनी खुशाल पुन्हा मंत्रिपदाची शपथ घ्यावी

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर कुठलाही दबाव राहणार नाही. चौकशी चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शक होईल. तसेच या प्रकरणातील सत्य बाहेर पडेल. या प्रकरणातील सत्य बाहेर आले आणि निर्दोष असल्याचे समोर आले तर धनंजय मुंडे यांनी खुशाल पुन्हा मंत्रिपदाची शपथ घ्यावी. आजकाल पहाटे, सायंकाळी, सकाळी आणि दुपारी केव्हाही शपथविधी होतच असतो. त्यामुळे एका मंत्र्यासाठी पुन्हा शपथविधी होऊ शकतो, असा खोचक टोला नरेंद्र पाटील यांनी लगावला.

अजितदादांनी एवढी मोठी पाठराखण केली आहे

चौकशीमध्ये धनंजय मुंडे यांच्या नावाचा उल्लेख होत असेल तर त्यांनी पदापासून अलिप्त राहायला हवे. राजीनाम्याने फायदा होईल की, नुकसान ते पाहू नये. कॅबिनेट मंत्र्यांचा जिल्हा आहे. त्यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरू आहे. पोलीस यंत्रणेवर दबाव आहे. पोलिसांच्या तक्रारी येत आहेत. धनंजय मुंडे यांनी काही वेळासाठी पदापासून दूर राहायला हवे. सरकार त्यांचेच आहे. अजितदादांनी एवढी मोठी पाठराखण केली आहे. एक दोन महिन्याचा प्रश्न आहे. एकदा का तपास पूर्ण झाला तर पुन्हा शपथविधी घ्या. कुणी अडवले आहे, असा थेट सवाल नरेंद्र पाटील यांनी केला.

दरम्यान, महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे आणि महंत यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे त्या दोघांनाच माहिती आहे. महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना निर्दोष सिद्ध करून एक प्रकारे क्लीन चिट दिली आहे. कुणाला क्लीन चिट द्यायची आणि नाही हा महंतांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तपास यंत्रणा वाल्मीक कराडचे आका, हप्तेखोर याचा तपास करतीलच, असा ठाम विश्वास नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
 

Web Title: narendra patil big claims dhananjay munde is saving walmik karad in beed case and said the demand for his resignation is right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.