सातारा - मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे जे सूत्रधार आहेत, ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर जरांगेंच्या मनातील गैरसमज दूर होतील. हा सूत्रधार सत्तेतील नाही असं सांगत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत.
माध्यमांशी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की, मनोज जरांगे यांनी आणि त्यांचं मार्गदर्शन करणाऱ्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १२ टक्के SEBC मधून आरक्षण मिळालं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना देवेंद्र फडणवीसांनी केली. मराठा समाजाच्या मुलांसाठी सारथी सारखी संस्था काढली. सारथीतून कितीतरी मराठा युवकांचा फायदा झालाय. महामंडळाच्या माध्यमातून १ लाख मराठा उद्योजक तयार झालेत. पहिल्या टप्प्यातील आरक्षणामुळे हजारो मुले कामाला लागलीत. एवढे चांगले काम करूनही मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करत असतील तर त्यामागे बोलविता धनी असला पाहिजे असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाच्या अगोदर मला भेटायचे. महामंडळाबाबत त्यांची काही कामे असायची ती आम्ही करत होतो. वारंवार सामान्य कार्यकर्ता म्हणून मनोज जरांगे पाटील न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत होते. आता त्यांच्या चळवळीचं रुपांतर झालंय. खासदारकीच्या निवडणुकीत त्यांनी त्यांचे वेगळेपण दाखवले. आता येणाऱ्या निवडणुकीत ते त्यांचे उमेदवार उभे करणार आहेत. कुणाच्याविरोधात उभे करणार, कुणाला उमेदवारी देणार हे अजून स्पष्ट नाही. मात्र राजकीय गणितांमध्ये जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केले जाते. यामागे सूत्रधार आहेत हे जरांगे पाटलांच्या लक्षात येईल आणि त्यांच्या मनात जो काही गैरसमज आहे तो दूर होईल असा दावा नरेंद्र पाटलांनी केला आहे.
दरम्यान, हा सूत्रधार कुणीही असू शकतो, जे सत्तेत नाहीत. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी भाजपा-शिवसेना सत्तेवर होती. त्यावेळी विरोधी पक्षात काँग्रेस राष्ट्रवादी होती. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून काम करतात मात्र शिवसेना ठाकरेंचा गट आहे तो असू शकतो, अजित पवार सत्तेत आहेत तर शरद पवारांची राष्ट्रवादी त्यामागे असू शकते. काही अतृप्त आत्मा असतील ज्यांना सातत्याने मराठा समाजाचे प्रश्न झुलवत ठेवायचे असतील ते तिथे मदत करत असतील असा संशयही नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.