शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यालयालयाने उद्धव ठाकरे यांना सशर्त परवानगी दिल्यानंतर ठाण्यात शिवसैनिकांनी जल्लोष केला. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. याच दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर टीका केली. तसेच "खऱ्या शिवसेनेच्या वाघाची डरकाळी ऐकायची असेल तर तुम्हाला बीकेसी मैदानातच यावं लागेल" असं म्हणत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "तुम्हाला बीकेसी मैदानातच यावं लागेल जर तुम्हाला विचारांचं सोनं लुटायचं असेल, सकारात्मक ऊर्जा भरून घ्यायची असेल, हिंदुत्वाची बाळासाहेबांनी पेटवलेली धगधगती मशाल पुन्हा अनुभवायची असेल, खऱ्या शिवसेनेच्या वाघाची डरकाळी ऐकायची असेल, शिवसेनेची ओळख असलेलं चैतन्य अनुभवायचं असेल... शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा" असं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
"रावण दहन होणार... #हिंदवी_तोफ_पुन्हा_धडाडणार, प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा वाघ पुन्हा एकदा डरकाळी फोडणार...." असं देखील नरेश म्हस्के यांनी शेअर केलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. म्हस्के यांनी याआधी देखीट ठाकरे गटावर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यासाठी शिवसैनिक हिंदुत्ववादी विचारांचे सोने लुटण्यासाठी येत होते. मात्र आता त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात हिंदुत्ववादी विचार सोडून टोमणेच अधिक असणार आहे असा टोला त्यांनी लगावला होता.
"बाप पळवणारी टोळी बॉम्ब; टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फू..."
मनसेने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. दसरा मेळाव्यावरून निशाणा साधला आहे. मनसेचे नेते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फू..." असं म्हणत खाली एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. ज्यामध्ये हसऱ्या मेळाव्याची तयारी सुरू असं म्हटलं आहे. गजानन काळे यांनी केलेल्या ट्विटमध्ये "साहेब आजच्या भाषणात कोणते मुद्दे असतील? त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्याचीच तयारी सुरू आहे. डिस्टर्ब करू नका असं म्हटलं आहे. तसेच टोमणे बॉम्ब, पाठीत खंजीर कोथळा बॉम्ब, मावळे कावळे बॉम्ब, मर्द छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब" असं देखील म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"