Narhari Zirwal: आगामी काहीस दिवसांत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत निकाल येऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे. महाविकास आघाडी आणि भाजप तसेच शिंदे गटासह अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. निकाल लवकरच लागेल, अशी शक्यता वर्तवली जात असताना, यासंदर्भात प्रतिक्रिया येत असून, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट शब्दांत थेट भाष्य केले आहे. झिरवळ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांना तुमच्याकडे आमदारांचे प्रकरण आल्यावर काय करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर येऊ दे तर खरी. आल्यावर पाहू. मी त्या आमदारांना अपात्र म्हणून पाठवले तर ते अपात्रच होतील. माझ्याकडे आल्यावर त्यांना अपात्रच करेन. न्यायालयातील निकाल विरोधात लागला तर मी चुकीचा निर्णय दिला असे होईल. मात्र, मी घटनेला धरुन निकाल दिला आहे. मग घटना चुकली असे म्हणता येईल का? असा प्रतिप्रश्न केला. तसेच मी दिलेला निर्णय बरोबर आहे, असे नमूद केले.
स्वप्न पाहायला काहीच अडचण नाही
तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का? असे नरहरी झरवळ यांना विचारण्यात आले. त्यावर, मी आजही मुख्यमंत्री होऊ शकतो. पण त्यासाठी संख्याबळ हवे ना. माझे कधीच होर्डिंग्ज लागणार नाहीत. लागले तर तुमचे आशीर्वाद पक्के असे समजायचे. स्वप्न पाहायला काहीच अडचण नाही. खुर्ची रिकामी नाही. पण सत्ता संघर्षावर लोकांचा तर्कवितर्क आहे. जर तरचा प्रश्न आहे. त्याला काही अर्थ नाही, असे झिरवळ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, केंद्रात उत्तर दायित्व आहे की नाही, अशी शंका येणे साहजिक आहे. पण सुप्रियाताई आहेच, त्यामुळे शंका घेण्याचे काम नाही. अजितदादा भाजपमध्ये जाणार असल्याची एक ते दीड महिन्यांपासून चर्चा आहे. आम्ही गेलो तर दादा जातील ना. पण आम्हालाच काही माहीत नाही. त्यामुळे अशा चर्चांना काहीच अर्थ नाही, या चर्चांचा आणि शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्याचा काही संबंध नाही, असा दावाही झिरवळ यांनी केला.