- अभय नरहर जोशी -
लंडन म्युझियममधील एका बखरीची अस्सल प्रत आमच्या हाती लागली आहे. ‘नरहरसुताची बखर’ असे त्याचे नाव आहे. शिवनेरीपासोन हडपसरपर्यंत पसरलेल्या शिरूर प्रांतात दोन मनसबदारांमध्ये घनघोर युद्धाचं वर्णन त्यात आहे. त्या धुमश्चक्रीच्या काळातील या दोघांपैकी एका मनसबदाराविषयीची निरीक्षणे या बखरकाराने चाणाक्षपणे नोंदवलीत. त्यातील काही अंश खास अभ्यासू वाचकांसाठी. (जे हा मजकूर वाचणार नाहीत, अथवा वाचावयाचा कंटाळा करतील ते अभ्यासू वाचक नाहीत, असे समजावे)...विनंती सेवक नरहरसुत विज्ञापना ऐसी जे साहेबी, मेहेरबानी करून सेवकास पुसिले, की ‘इस्तिकबिल‘पासून चरित्र लिहून देणे. म्हणोन आज्ञा केली त्याज करून वर्तमान ऐसी जे... (वरची ही भाषा फारच ऐतिहासिक होत असल्याने आम्हालाही समजेनासं झालंय. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी सुगम ऐतिहासिक भाषेत हा मजकूर देत आहोत.)सांप्रतकाळी शिरूर प्रांती दादाराजे आणि अमोलराजीयांमध्ये मातब्बर लढाई रंगलेली. दादाराजे मातबर सरदार. दस हजारी तालेवार मनसबदार. या प्रांती पूर्वी तीन घनघोर लढाया त्यांनी मारिल्या होत्या. अमोलराजीये त्यांचेच शिलेदार. त्यांच्याच सेनेत राहून धनुर्विद्येत (धनुष्य-बाण विद्या) प्रावीण्य मिळवले. दादाराजे असेपर्यंत आपल्याला सरदारकीची वस्त्रे मिळणार नाहीत म्हणोन ते ‘बारामती’ संस्थानच्या गोटात गेलेले. ‘बारामती‘चे संस्थानिक महाधुरंधर मुत्सद्दी आणि योद्धे. त्यांनी सुत्तरनाले, ‘हस्त’नाल्यांसोबत ‘घडियाल’ नामक अस्त्रांतून काटे फेकण्याची तालीम अमोलराजेंना दिली. जात्याच हुशार अमोलराजेंनी ते लगेच अंगी बाणवले आणि दादाराजेंना ललकारले. अशा अमोलराजीयांचा नारायणगावी कोल्हे घराण्यात जन्म जाहला. मातब्बर बैलगाडामालकांचे हे घराणे. बालपणापासोन अमोलराजीयांची हुशारी बहुत ख्यात. विद्यार्जनी प्रावीण्य मिळवण्यात ते सदा अग्रणी. विद्यार्जन घेताना दहावा-बाराव्या वर्षी तर प्रांतीच्या गुणवत्ता यादीची शोभा त्यांच्या नावाने वाढलेली. येवढेच नव्हे तर या प्रांतीचा शिष्यवृत्तीचा ‘प्रज्ञा शोध’ही त्यांच्यापाशीच येऊन संपिला. अशी राजीयांची प्रज्ञा. राजीयांनी तद्नंतर वैद्यकशास्त्रात प्रावीण्य प्राप्त केले अन् काही काळ ते वैद्यराज म्हणोनि दीनदुबळ्यांच्या चरणी सेवारत होते. ‘जे हत्ते काळाचे ठायी’ अर्थात काळाचा महिमा पहा. वैद्यराज अमोलराजीयांना आधी अभिनयानं भूल घातिली. नंतर त्यांनी अभिनय करोनि अवघ्या रयतेला भूल घातिली. साक्षात शिवछत्रपती, शंभूराजे त्यांच्या रूपात पुन्हा अवतरलेले रयतेला भासले. शंभूराजांचे अस्सल दर्शन रयतेला घडावे म्हणोन आर्थिक रसद कमी पडू लागल्याने अमोलराजीयांनी आपले घर विकोन संपत्तीचा त्यासाठी विनियोग केला. अमोलराजीयांविषयी काय बोलावे. त्यांचे कैसे ते बोलणे, कैसे ते चालणे, कैसी ती सलगी करणे. तयांचे बोलणे ऐकोनि रयतेला डोलण्याशिवाय काही सुचले तरच नवल. अभिनयक्षेत्री मुलुखमैदान मारल्यानंतर राज्यकारभारात राजीयांना रस वाटू लागला. आपल्या प्रांती रयतेच्या कल्याणासाठी शिरूर मुलखातून दिल्लीकडे कूच करावेसे वाटू लागले. केवळ त्यासाठीच आपले सरदार असलेल्या दादाराजांविरुद्ध त्यांनी एल्गार पुकारला. अमोलराजीयांनी मोठ्या हुशारीने मैदान मारण्याची सर्व तयारी केली. पंचहजारी, दसहजारी मनसबदारांशी संगनमत केले. मात्र, अमोलराजीयांनी दादाराजांवर जातीने स्वत: वार करणार नसल्याची प्रतिज्ञा घेतली. परंतु ‘घडियाल’ अस्त्राच्या बारीक टोकदार काटेफेकीने त्यांनी दादारावांना बेजार करोनि सोडिले. आपल्या ऐतिहासिक रूपांचा वापर या लढाईत करणार नसल्याचा त्यांचा दावा, परंतु शिरूर प्रांती असलेल्या शिव-शंभोराजेंच्या ऐतिहासिक स्थानांकडे रयतेचा ओढा वाढला. तेथे ती जथ्यांनी आपल्यामुळेच येऊ लागल्याचं ते खुबीनं सुचवत. आपल्या आधी दादाराजांनी लढाई मारली; कारण दादारावांविरुद्ध मातबर मनसबदार नव्हते, असाही त्यांचा दुसरा दावा. आधीच्या मनसबदारांना वाचासिद्धी नव्हती, त्यांचे उच्च विद्यार्जन नव्हते, तद्वतच ते तुल्यबळ नव्हते आणि आपण कसे तुल्यबळ आहोत, हे ते सूचकपणे सुचवत शिवसृष्टी, शिवनेरीविकास, भूमिपुत्रांना अर्थार्जने देवोनि अवघ्या मुलखाचेन कल्याण करू, अशी साद त्यांनी रयतेला घातली. त्यांनी कूच करून मजल-दरमजल करीत भीमथडीला त्यांनी आपली फौज आणून तळ ठोकिला. दादाराजांंच्या फौजेनेही पलिकडे तळ ठोकिला. ते समयी दोही तर्फेने तोफांचा, ‘हस्त’नाले, सुतरनाले, धनुष्यातून सोडलेल्या बाणांचा, तैसेच ‘घडियाल’अस्त्रातून काट्यांचा मार ऐसा सुरू जाहला की भडभुंजे लाह्या भाजतात, की विद्दुल्लतापात होतो, तैसा धडाका जाहाला. मोठी गर्दी जाहाली. बाणांचा-काट्यांचा वर्षाव मेघमालांप्रमाणे होऊ लागला. तेणेकरून कोणी कोणास दिसेनासे जाहाले. आलिकडे मराठियांनी झुंज याप्रमाणे पाहिलें नाही. न भुतों, न भविष्यती. ते पाहोन दादाराजे-अमोलराजीये दोहों उद्गारले, ‘रण सोडणार नाही. अपैश मरणाहून वोखटे!’ - अभय नरहर जोशी -