नाशिक/मुंबई : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील किमान तापमान कमी झाले असून, थंडी वाढली आहे. नाशिकला हुडहुडी भरली असून, निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे येथे ३.२, तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर ५ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. दरम्यान, नानासाहेब भंडारे यांच्या शेतातील पुदिन्यावरील दवबिंदू गोठून त्याचे रूपांतर बर्फात झाले होते. बुधवारी नाशिकचे तापमान ६.४ नोंदवण्यात आले, तर मुंबईही थंडच असून, किमान तापमान १६ अंशावर स्थिर आहे.कसबे-सुकेणे गोदावरी-बाणगंगा-कादवा या नदी खोऱ्यात असल्याने या भागात तापमान नेहमीच कमी असते. सन २०१२ या वर्षी कुंदेवाडी येथील केंद्रावर ०.०२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली होती. त्या वेळीही दवबिंदू गोठून बर्फात रूपांतर झाले होते. राज्यात ३१ जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहणार असून, किमान व कमाल तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. बुधवारी कोकणातील हवामानात ३ ते ५ अंशांची घट झाली आहे. कोकण, विदर्भाच्या काही भागांतील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून, मध्य महाराष्ट्रातही रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. जळगाव येथे तब्बल साडेपाच अंशांनी घट होऊन, ७ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. नांदेड येथे ही ३ अंशांनी घट होऊन, १०.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. (प्रतिनिधी)किमान तापमान : पुणे ११.२, लोहगाव १२.९, अहमदनगर ९.८, जळगाव ७, महाबळेश्वर १५.२, मालेगाव ९.४, नाशिक ६.४, सांगली १६, सातारा १३.१, सोलापूर १७, अलिबाग १६.४, रत्नागिरी १५.१, उस्मानाबाद १४.४, औरंगाबाद १२.३, परभणी १४.१, नांदेड १०.५, अकोला १२, अमरावती १२.८, बुलडाणा १५, चंद्रपूर १७.९, गोंदिया १५.३, नागपूर १३.३, वाशिम १५.४, वर्धा १४.५, यवतमाळ १४.
नाशिक गारठले; कसबे सुकेणेत दवबिंदू गोठले !
By admin | Published: January 28, 2016 1:27 AM