राजू काळे/भाईंदर - पूर्वेकडील प्रभाग चारमध्ये ग्रामपंचायत काळापासून अस्तित्वात असलेल्या व अद्यापपर्यंत डागडुजी करण्यात न झाल्याने जीर्णावस्थेकडे झुकलेल्या खारीगाव मासळी बाजाराला लवकरच नवसंजीवनी मिळणार आहे. मासळी बाजाराच्या आधुनिकीकरणासाठी ६४ लाख ३९ हजार ५४१ रुपयांच्या निधीला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
मौजे खारीगाव येथील सर्व्हे क्र. ५३/३ वरील जागा पालिकेच्या मालकीची असून या जागेच्या वापराचा निर्णय पालिकेच्याच अखत्यारीत असल्याने त्याचा विकासही करण्याची जबाबदारी पालिकेचीच आहे, असा दावा प्रशासनाकडून 25 वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिकांच्या सोईसाठी त्या जागेवर ग्रामपंचायत काळातच मासळी मार्केट बांधण्यात आले. या मार्केटमध्ये सुमारे ६१ मासळी विक्रेते व्यवसाय करीत असून १० वर्षांपूर्वी त्याचे नुतनीकरण करण्यात येणार असल्याच्या वावटळ्या उठवण्यात आल्याने मासळी विक्रेत्यांनी बाजार कराचा भरणा बंद केला.
परंतु, त्याचे नुतनीकरण अद्यापही करण्यात आलेले नाही. त्यामुळे ते जीर्णावस्थेकडे झुकले. २१ डिसेबर २०१० रोजी त्यावेळचे प्रभाग अध्यक्ष प्रेमनाथ पाटील यांनी पालिकेला बाजार नुतनीकरणाचा प्रस्ताव सादर केला. त्यात नियोजित एकमजली इमारतीतील तळमजल्यावर सर्व सोईयुक्त मासळी बाजार तर पहिल्या मजल्यावर मार्केटच्या रोजच्या सफाईसाठी आरोग्य विभागाच्या कार्यालयास जागा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्याला स्थायी समितीने ६ जुलै २०११ रोजी मंजुरी देत पालिकेच्या सर्वसाधारण निधीतून ३८ लाख १५ हजार ६०० रुपयाची तरतुद त्याच्या नुतनीकरणासाठी करण्यात आली.
बांधकाम विभागाने बाजाराच्या नुतनीकरणाचा कार्यादेश काढुन त्याचा ठेका ललित एन्टरप्रायझेस या कंत्राटदाराला दिला. त्याची कुणकुण स्थानिक पुढा-यांना लागताच त्यांनी मासळी बाजाराच्या जागेवर मालकी हक्क गाजविण्याचा प्रयत्न सुरु केला. या जागेवरील मासळी बाजाराचे नुतनीकरण करण्यापूर्वी आर्थिक मोबदला देण्याची मागणी प्रशासनाकडे होऊ लागली. ही बाब तत्कालिन महासभेतही चर्चेला आली. या जागेच्या मालकी वादामुळे मासळी बाजाराच्या जागेबाबत त्यावेळी अनभिज्ञ असलेला मुळ मालक तुकाराम बारक्या पाटील यांना जागेवरील मालकी आठवली. त्यांनी पालिकेला वकिलामार्फत नोटीस बजावून बाजाराच्या जागेवर आपलाच हक्क असून ती पालिकेने घेण्यापूर्वी त्याचा आर्थिक मोबदला अथवा टीडीआर देण्याची मागणी केली.
त्यावर तत्कालिन आयुक्त अच्युत हांगे यांनी पाटील यांना जागेचे कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असता ते सादर करण्यात आले. यानंतर पालिकेने पाटील यांना जागेचा २०१६ मधील बाजारभावाप्रमाणे २५ लाख ८५ हजार रुपये मोबदला अदा करुन जागेच्या सातबा-यावर पालिकेचे नाव चढविले. यामुळेच मासळी बाजाराच्या नुतनीकरणाचा तिढा ख-या अर्थाने सुटला. यानंतर ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी बाजाराच्या नुतनीकरणासाठी पुन्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला. त्यावर नुकत्याच पार पडलेल्या विशेष महासभेत बाजाराच्या नुतनीकरणासाठी ६४ लाख ३९ हजार ५४१ रुपयांच्या आर्थिक व प्रशासकीय प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. परिणामी याच बाजाराचे व्यवहार वा नुतनीकरण प्रक्रिया प्रशासनाने ६ वर्षांपूर्वीच ठोसपणे राबविली असती तर त्याचा खर्च दुप्पटीने वाढला नसता, अशी प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.