नाशिक : जन्मत: हृदय, फुप्फुसाला व्यंग असलेले किंवा अपुरी वाढ होऊन नुकतेच जन्मलेले मूल अत्यंत गंभीर अवस्थेत उपचारासाठी शहरासह जिल्ह्यातून नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. मुळात १८ ‘वॉर्मर’ची क्षमता असलेल्या विशेष नवजात शिशू दक्षता विभागात उपचारासाठी साडेतीनशे अर्भके आॅगस्टमध्ये दाखल झाली होती. त्यापैकी ५५ बालकांचा श्वास ‘व्हेंटिलेटर’अभावी थांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.नाशिकचे जिल्हा शासकीय रुग्णालय श्रेणी दोनमध्ये समाविष्ट असल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या रुग्णालयात ‘टर्शरी केअर सेंटर’ नसल्यामुळे आॅक्सिजनची गरज भासणाºया नवजात शिशुंना व्हेंटिलेटरसह तज्ज्ञ डॉक्टरदेखील पुरविणे शक्य होत नाही. यामुळे अखेरच्या टप्प्यात धोक्याची पातळी ओलांडलेल्या गंभीर शिशुंचा आॅक्सिजनअभावी मृत्यू होत असल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाने क बूल केले. २९१ बालकांचा जीव वाचविण्यास प्रशासनाला यश आले असून, सध्या ५२ अर्भकांवर उपचार सुरू आहेत....म्हणून एका ‘वॉर्मर’वर चार अर्भकेजिल्हा रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत पोहचलेली नवजात बालके उपचारासाठी अखेरच्या टप्प्यात येतात. शासकीय रुग्णालय असल्यामुळे नागरिकांना नकार देता येत नाही. दक्षता विभागाची क्षमता कमी असून भौतिक सुविधा व यंत्रणाही अपुरी असल्यामुळे एका ‘वॉर्मर’वर चार बालके ठेवून उपचार करावा लागत आहे. ग्रामीण भागासह महापालिका प्रसूतिगृह, खासगी रुग्णालयांमधून गंभीर अवस्थेत पोहचलेल्या बालकांचे उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
चार वृक्ष देताहेत ‘मृत्यू’ला निमंत्रणविशेष नवजात शिशू दक्षता विभागाच्या विस्तारासाठी मंजूर असलेल्या नूतन इमारतीकरिता शासनाने २१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध क रून दिला आहे; मात्र अद्याप जिल्हा रुग्णालयाच्या आवारात केवळ बोटावर मोजण्याइतक्या झाडांच्या अडथळ्यामुळे पाच मजली इमारतीच्या भूमिपूजनाला मुहूर्त लाभत नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीकडून गुलमोहरसारख्या पर्यावरणपूरक नसलेल्या वृक्षतोडीला परवानगी दिली जात नसल्यामुळे नवजात शिशू दक्षता विभागाच्या विस्तारासह त्या विभागातील ‘वॉर्मर’ची संख्या वाढविण्यास अडथळा येत असल्याचे जगदाळे म्हणाले.