नाशिक : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये शिपाई पदावर नोकरीस लावून देण्याचे अमिष दाखवून आडकेनगर परिसरातील एका युवकाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ विशेष म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये नोकरीस असलेली महिला कर्मचारी संशयित सुरेखा माळोदे (रा. रेणुका वैभव सोसायटी, स्टेट बँकेच्या मागे, आडकेनगर, देवळाली कॅम्प, नाशिक)हिने पती राजेश माळोदे यांच्या मदतीने ही फसवणूक केल्याचे समोर आले असून या दोघांविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात प्रवीण देवधर दोंदे (वय ३८, रा. जी अपार्टमेंट, ४, आडकेनगर, देवळाली कॅम्प, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सुरेखा माळोदे या अनेक वर्षांपासून देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात शिपाईपदावर नोकरीस आहेत. त्यांनी पाच लाख रुपये दिल्यास देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात शिपाईपदावर नोकरीस लावून देते असे दोंदे यांना सांगितले. या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रवीण दोंदे यांनी नोकरीसाठी साडेतीन लाख रुपये देण्याचे कबूल केले. त्यासाठी नातेवाईक तुषार भोसले यांच्याकडून दोन लाख रुपये हातउसनवारही घेतले.
१५ सप्टेंबर २०१५ रोजी दोंदे पैसे देण्यासाठी गेले असता माळोदे यांनी स्वत:चे खाते असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या शाखेत भरण्यास सांगितले. दोंदे यांनी दोन लाख रुपये बँक खात्यात जमा केले व उर्वरीत रक्कम वेळोवेळी नेऊन दिली़ पैसे भरूनही काम होत नसल्याने दोंदे यांना संशय आला व त्यांनी आपले साडेतीन लाख रुपये माळोदे दाम्पत्याकडून परत मागितले़ मात्र, या दाम्पत्याने पैसे परत देण्यास नकार देत दमदाटी करून शिवीगाळ केली़ त्यामुळे दोंदे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली़