नवी दिल्ली - नाशिक येथे घडलेल्या बसच्या दुर्देवी घटनेत १० प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हळहळ व्यक्त केली. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या जवळच्या गमावले त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत. या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.
त्याचसोबत पंतप्रधान निधीतून या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार जाहीर करण्यात आले आहेत. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि.8) पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला. अपघातात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने जवळपास १० प्रवासी होरपळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिक महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यासंदर्भातील प्राथमिक माहिती दिली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.
राज्य सरकारकडूनही मदत जाहीरऔरंगाबाद रोडवरील भीषण अपघातात होरपळून जीव गेलेल्या १० प्रवाशांच्या वारसांना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही घटनास्थळी पोहचून आढावा घेतला. टँकर आणि बस या धडकेत बसला भीषण आग लागली. त्यात १० प्रवाशांचा जीव गेला तर ३७ जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने चालली होती तर नाशिकहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या टँकरमध्ये धडक झाली. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जाणार आहेत अशी माहितीही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.
दैव बलवत्तर म्हणून बचावलोपहाटेच्या सुमारास आम्ही सगळे लक्झरी बस मध्ये झोपलेला असताना अचानक मोठा आवाज झाला आणि बस संपूर्णपणे आगीत सापडली होती. यावेळी कसेबसे मी माझ्या लेकीसह बसमधून जीव वाचून बाहेर पडले माझे नशीब चांगले म्हणून मी आणि माझी लेक बचावलो - अनिता चौधरी, (रा. लोणी, जि.वाशीम)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"