यवतमाळ - नाशिक येथे झालेल्या अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसवल्याचं निदर्शनास आले आहे. या दुर्घटनेची चौकशी करून कारवाईचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. पालकमंत्री राठोड यांनी अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात भेट दिली. नाशिक जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला. शिवाय ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाशांबाबत माहिती घेतली.
या अपघातात बसला आग लागण्यामागे कारण काय, ट्रॅव्हल्स बसमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती काय याबाबत माहिती घेऊन मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या. या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात ग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १८, वाशीम येथील सहा, मालेगाव येथील ४ मेहकर येथील ३ प्रवासी बसल्याची माहिती ट्रॅव्हल्स कार्यालयातून मिळाली.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीरनाशिक बस दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हळहळ व्यक्त केली. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या जवळच्या गमावले त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत. या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. त्याचसोबत पंतप्रधान निधीतून या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार जाहीर करण्यात आले आहेत.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अपघाताबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघाताच्या कारणांचा सर्वंकष चौकशीतून शोध घेतला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरील मदतीसाठी तसेच रूग्णालयातील उपचारासाठी सर्व यंत्रणा तातडीने कार्यान्वित व्हाव्यात यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
दैव बलवत्तर म्हणून बचावलोपहाटेच्या सुमारास आम्ही सगळे लक्झरी बस मध्ये झोपलेला असताना अचानक मोठा आवाज झाला आणि बस संपूर्णपणे आगीत सापडली होती. यावेळी कसेबसे मी माझ्या लेकीसह बसमधून जीव वाचून बाहेर पडले माझे नशीब चांगले म्हणून मी आणि माझी लेक बचावलो - अनिता चौधरी, (रा. लोणी, जि.वाशीम)