ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 11 - राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून अग्रस्थानावर आहे. अहमदनगर, महाबळेश्वर, सातारा अशा सर्वच शहरांपेक्षा नाशिकमध्ये थंडीचा कडाका मागील चार दिवसांपासून सर्वाधिक आहे. किमान तापमानात सातत्याने होणा-या घसरणीमुळे नाशिककर गारठले आहेत. बुधवारी सकाळी हवामान खात्याने मोजलेले किमान तापमानाचा पारा ५.८ अंशावर स्थिरावला. मंगळवारी ६.५ अंशावर किमान तापमान होते. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून पारा ५ अंशावर आला आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिककर चांगलेच गारठले असून आतापर्यंत या हंगामातील सर्वात निचांकी तपमानाची नोंद बुधवारी हवामान खात्याकडून करण्यात आली. अहमदनगरचे किमान तपमान ७.१, मालेगाव ७.४, पुणे ७.७, सातारा १०.०, सांगली ११.५, सोलापूर १०.७, उस्मानाबाद ८.४, अकोला ९.५, अमरावती ९.२, महाबळेश्वर १२.० असे प्रमुख शहरांचा पारा पुण्याच्या वेधशाळेने नोंदविला.
जानेवारी महिना नाशिकचा इतिहास बघता दरवर्षी कडाक्याच्या थंडीचा राहिला आहे. २०१५ साली २५ डिसेंबरला हंगामातील ५.४ अंश इतक्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. तसेच २०१६मध्ये २२ जानेवारीला ५.५ निचांकी तापमान नोंदविले गेले होते. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून डॉक्टरांकडून पाणी गरम करुन पिण्याचा सल्ला दिला जात आहे.