मुंबई : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाम विरोध आहे. नाशिक शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याबाबत महापालिकेत कोणतीच चर्चा झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव पाठविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नाशिकचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश होऊ देणार नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. शहरांच्या विकासासाठी केंद्र सरकारने आणलेली स्मार्ट सिटी योजना फसवी आहे. या योजनेंतर्गत महापालिकांना केवळ १०० ते २०० कोटी रुपये मिळणार आहेत. इतक्या कमी निधीतून शहरांचा कसलाच विकास होणार नाही. इतक्या कमी निधीतून कुठलाच चांगला प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही. महापालिकेने केलेल्या चांगल्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी स्मार्ट सिटी योजना आखण्यात आली आहे. महापालिका ही स्वायत्त संस्था आहे आणि स्वत:च्या निधीतून शहरातील विकासकामे करीत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या शहरांचा अर्थसंकल्प हजारो कोटींच्या घरात आहे. त्यामुळे या महापालिकांना १०० ते २०० कोटी देणे हास्यास्पद आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक कंपनी स्थापन केली जाणार असून, त्याद्वारे महापालिकेच्या कारभारात ढवळाढवळ करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याची टीका राज यांनी केली. चांगल्या गोष्टींना माझा पाठिंबा असेलच, पण केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमागील हेतू स्वच्छ नाही. त्यामुळे नाशिकचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश होऊ देणार नाही, असे राज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘नाशिक’चा स्मार्ट सिटीत समावेश नाहीच - राज
By admin | Published: December 11, 2015 1:50 AM