ठळक मुद्दे मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूकअॅड. वैशाली भोसले यांनी ७ हजार ४५३ मते तर डॉ. स्नेहल संजय चव्हाण यांना ५ हजार १३१ मते
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३च्या रिक्त जागेसाठी शुक्रवारी (दि.६) झालेल्या पोटनिवडणूकीत मनसे विरुध्द शिवसेना अशी लढत होती. शनिवारी (दि.७) मतमोजणी होऊन मनसेच्या उमदेवार अॅड. वैशाली भोसले यांनी ७ हजार ४५३ मते मिळाली तर सेनेच्या डॉ. स्नेहल संजय चव्हाण यांना ५ हजार १३१ मते मिळाली. भोसले यांच्या विजयाने मनसेने पुन्हा या प्रभागात गड राखण्यात यश मिळविले. मनसेच्या इंजिनने दुसऱ्या फेरीपासून धरलेला सुसाट वेग पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिल्याने सेना-भाजपाचा धुव्वा उडाला.
नाशिकमधील प्रभाग १३(क)मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.शनिवारी (दि.७) गंगापुररोडवरील शिवसत्य मंडळाच्या सभागृहात मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या फेरीत चव्हाण यांना ६९५ तर भोसले यांना ३७३ मते होती; मात्र दुस-या फेरीत भोसले यांनी आघाडी घेतली त्यांना ६७७ तर चव्हाण यांना ३४० मते मिळाली. सहाव्या फेरीत भोसले यांना १हजार १६१ तर चव्हाण यांना ३४५ मते मिळाली. या फेरीपासून भोसले यांनी घेतलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली. सहाव्या फेरीपासून मतदारांचा कौल भोसले यांच्या बाजून अधिक गेल्याचे दिसून आले. भाजपाच्या विजया लोणारी यांना अवघे ४ हजार ८१० मते मिळू शकली. या निवडणूकीत आठ उमेदवार जरी रिंगणात होते तरी मनसे, सेना व भाजपाच्या उमेदवारात लढत पहावयास मिळाली. अल्प मतदानाचा लाभ मनसेलाच झाला. भाजपा तीस-या स्थानावर फेकली गेली. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मनसेने प्रयत्न केले. परंतु शिवसेना व भाजपाने उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरविल्याने चुरस निर्माण झाली.
अवघे ३९.७१ टक्के मतदान
शुक्रवारी झालेल्या मतदानात मतदारांचा फारसा उत्साह दिसून आला नाही. पहिल्या सहा तासांत केवळ १७ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अवघे ३९.७१ टक्के मतदान होऊ शकले. प्रभागातील ६१ मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दोन्ही उमेदवारांना राजकिय पार्श्वभूमीसेना-मनसे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना राजकिय पार्श्वभूमी होती. माजी नगरसेवक संजय चव्हाण यांच्या कन्या स्नेहल या शिवसेनेकडून नशीब अजमावत होत्या तर दिवंगत सुरेखाताई भोसले यांच्या स्नुषा अॅड. वैशाली भोसले यादेखील आपल्या सासूचा वारसा पुढे चालविण्यासाठी निवडणूकीत उतरल्या व त्यांनाच मतदारांचा कौल मिळाला.