Maharashtra Politics: सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून हटवलं पक्षाचं नाव; काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 10:59 AM2023-01-18T10:59:46+5:302023-01-18T11:01:36+5:30
Maharashtra Politics: पक्ष कारवाई करण्यापूर्वी सत्यजित तांबे काँग्रेसला राम राम करणार का, अशी चर्चा असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत अत्यंत चुरस पाहायला मिळत आहे. नाशिकच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, सुधीर तांबे यांनी मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली. सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे. यानंतर काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावर कारवाई केली. यातच आता सत्यजित तांबे यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून काँग्रेसचे नाव आणि लोगो हटवल्याचा दावा केला जात आहे. यामुळे आता सत्यजित तांबे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिला असतानाही ऐनवेळी डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. ऐनवेळी पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. सुधीर तांबे यांच्यानंतर सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेस कारवाई करणार का, अशी विचारणा होत असतानाच सत्यजित तांबे यांनी सोशल मिडियावरील आपले प्रोफाइल बदलले असून ट्विटर डीपी आणि बायोमधून काँग्रेस पक्षाचा उल्लेख काढून टाकल्याचे सांगितले जात आहे.
फेसबुक, ट्विटर कव्हर पेजवरील संदेशाने वेधले लक्ष
सत्यजित तांबे यांनी आपल्या फेसबुक पेज आणि ट्विटरच्या कव्हर पेजवर एक संदेश शेअर केला असून, हा संकेतात्मक संदेश लक्ष वेधून घेत असल्याचे बोलले जात आहे. त्यावरून सत्यजित तांबे यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय पक्का झालाय की काय अशी चर्चा आहे. ‘वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावचं लागतं’, असा मजकूर या संदेशात आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भाजपकडे ते पाठिंबा मागतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत सूचक वक्तव्ये केली आहे. मात्र भाजपाचा पाठिंबा नेमका कुणाला आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"