अहमदनगर - बाळासाहेब साळुंखे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. खरे तर महाराष्ट्रात अनेक पदाधिकारी राजीनामा देणार होते. मी प्रत्येकाला सांगितले कुणीही राजीनामा देण्याचं आवश्यकता नाही. प्रत्येकाने आपापलं काम करा. आपण पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. मागील १०० वर्ष कुटुंबावर आणि काँग्रेस पक्षासोबत काम केलेय. त्यामुळे कुठेही काहीही निर्णय घेता कामा नये. राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होत राहील. जेव्हा वेळ येईल तेव्हा सविस्तर यावर विषयावर बोलूच असा निरोप राज्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांना दिला असा दावा नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सत्यजित तांबे यांनी केला आहे.
सत्यजित तांबे म्हणाले की, सगळ्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पाठिशी आहेत. डॉ. तांबेची निवडणूक आल्यावर सगळेच एकत्रित येतात. आम्ही आणि आमच्या कुटुंबाने कधीही पक्षीय, जातीय आणि धार्मिक भेद पाहिले नाहीत. जो येईल त्या माणसाची मदत करण्याची भूमिका कुटुंबाने घेतली. सगळे आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेत. २२ वर्ष संघटनेच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक जीवनात काम करतोय. २००० साली NSUI च्या माध्यमातून मी पक्षीय राजकारणाला सुरूवात केली. राज्याचा युवक अध्यक्ष म्हणून काम केले. मी देशातील प्रत्येक राज्यात काँग्रेसच्या कामासाठी गेलो असेल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्याचं काम करत आलोय. त्यामुळे माझ्यावर प्रेम करणारे कडवट कार्यकर्ते होते त्यांचे विचार होते नवी पिढी पुढे यायला हवी. मोठ्या व्यासपीठावर हे काम मांडण्याची गरज आहे. त्यातून या निवडणुकीत उभा राहिलो असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत सर्व शिक्षक संघटनांचे आभार ज्यांनी माझ्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या ७-८ दिवसांपासून जे राजकारण सुरू आहे त्यातून सगळ्यांनी तांबे कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला त्याचे आभार आहोत. हा मतदारसंघ छोटा नाही. अहिल्याबाईंचे जन्मगाव असल्यापासून गुजरात, मध्य प्रदेशाच्या बोर्डरपर्यंत हा मतदारसंघ आहे. ४ हजार गावे आहेत. या भव्य मतदारसंघात गेल्या १४ वर्षापासून सुधीर तांबे यांनी जनसंपर्क ठेवला. इतके मोठे काम कुठल्याच लोकप्रतिनिधींनी केले नसेल जितके सुधीर तांबे यांनी केले. सर्वात जास्त फिरणारे आमदार म्हणून सुधीर तांबेंचा उल्लेख होतो. दिवसाला ४०० किमीचा प्रवास केला. प्रत्येक दुर्मिळ भागात सुविधा पोहचवण्याचं काम सुधीर तांबे यांनी केले असंही सत्यजित तांबेंनी म्हटलं.