विश्वासघात! सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाही; नाना पटोलेंनी स्पष्ट केले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 12:12 PM2023-01-13T12:12:20+5:302023-01-13T12:12:54+5:30
नाशिक निवडणुकीबाबत आम्ही अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल असं पटोले म्हणाले.
मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या ३० जानेवारीला निवडणूक होत आहे. त्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. याठिकाणी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्ज न भरला नाही. तर त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या क्षणी घडलेल्या या राजकीय नाट्यामुळे काँग्रेसला जबर धक्का बसला. तर ही भाजपाचीच खेळी असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलं.
त्यात आता सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही असं स्पष्ट विधान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पटोले म्हणाले की, नाशिक निवडणुकीबाबत आम्ही अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल. मात्र बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. मात्र सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच मुलाला अपक्ष फॉर्म भरून भाजपाचा पाठिंबा घेणार म्हटलं आहे. हा एकप्रकारे विश्वासघात आहे. हायकमांडला आम्ही सगळे कळवले आहे. त्यानंतर कुणाला पाठिंबा द्यायचा हे स्पष्ट करू. काँग्रेस बंडखोराला पाठिंबा देणार नाही. सगळं ठरलेला कार्यक्रम होता. भाजपाने त्याठिकाणी फॉर्म भरला नाही. त्यामुळे पदवीधर मतदार अडाणी नाहीत. त्यांना सगळं कळतेय. भाजपा भय दाखवून घरं तोडण्याची कामे करतंय. भाजपाला त्याचा आनंद होतोय. ज्यादिवशी भाजपाचं घर फुटेल तेव्हा इतरांची घरे फुटण्याचं दु:ख कळेल असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे.
बाळासाहेब थोरात दुपारपर्यंत संपर्कात होते, पण आता...;
दरम्यान, या संपूर्ण घडामोडीनंतर बाळासाहेब थोरात संपर्कात होते का अशी विचारणा पत्रकारांनी नाना पटोलेंना केली. तेव्हा काल दुपारपर्यंत ते संपर्कात होते. पण त्यानंतर संपर्कात नाही असंही स्पष्ट केले आहे.
...तर सरकारला जाब विचारू
राज्यात MPSC परीक्षांसाठी मुलांनी मागील ३-४ वर्षापासून तयारी केल्यात. नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा होतील असं शासनानं ठरवले. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसनं विधानसभेतही केली आहे. २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम सुरू करावा. राज्य शासनाकडून जो अन्याय सुरू आहे त्याचा निषेध करतो. विद्यार्थ्यांनी जे राज्यव्यापी आंदोलन उभारलं आहे त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. सरकार जर गरीब मुलांचे ऐकत नसेल तर काँग्रेस जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिला आहे.