प्रकरण गंभीर, थोरातांना अधिक माहिती असू शकते; अशोक चव्हाणांनी मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 02:15 PM2023-01-13T14:15:00+5:302023-01-13T14:15:39+5:30
जे घडलंय ते दिसतेय. ही वस्तूस्थिती आहे. सत्यता तपासावी लागेल. संबंधित लोकांची चौकशी करून याची दखल पक्षाने घेतली पाहिजे असं अशोक चव्हाण म्हणाले.
नांदेड - नाशिक निवडणुकीतील प्रकरण गंभीर आहे. वृत्तपत्र आणि ऐकीव माहितीच्या आधारे हे प्रकरण गंभीर आहे असं मला वाटतं. मूळ उमेदवार सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला असताना त्यांनी नामांकन अर्ज भरला नाही. प्रदेशाध्यक्षांच्या म्हणण्याप्रमाणे कोरा फॉर्म दिला होता. जर इच्छा असती तर सत्यजितला एबी फॉर्म दिला असता. त्यामुळे हे गंभीर आहे. हा विषय ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातील असल्याने त्यांना कदाचित यात नेमके काय घडले याबाबत अधिक माहिती असू शकते अशी भूमिका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मांडली.
अशोक चव्हाण म्हणाले की, या प्रकरणाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली असेल. या घडामोडीमुळे पक्षाला एक जागा गमवावी लागतेय. त्यामुळे याबाबत दखल घेऊन पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. बाळासाहेब थोरात आजारी आहेत याची कल्पना आहे. त्यांना दुखापत झाल्याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्यांची यात भूमिका असेल याच्या निष्कर्षात येणे उचित नाही. मात्र जे काही घडले त्यात पक्षाचं नुकसान झाले आहे. यात अधिकची माहिती बाळासाहेब थोरात घेऊन देऊ शकतात असं चव्हाणांनी म्हटलं.
तसेच जे घडलंय ते दिसतेय. ही वस्तूस्थिती आहे. सत्यता तपासावी लागेल. संबंधित लोकांची चौकशी करून याची दखल पक्षाने घेतली पाहिजे. प्रदेशाध्यक्षांना मते मांडण्याचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकारानुसार ते बोलले आहेत असंही अशोक चव्हाणांनी सांगितले आहे.
बंडखोर उमेदवाराला पाठिंबा नाही - काँग्रेस
सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही असं स्पष्ट विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पटोले म्हणाले की, नाशिक निवडणुकीबाबत आम्ही अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल. मात्र बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही हे स्पष्ट आहे. आम्ही पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. मात्र सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली आहे असा आरोप त्यांनी केला.