Nashik Graduate Election : मोठी बातमी! सुधीर तांबे काँग्रेस पक्षातून निलंबन; हायकमांडद्वारे चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 06:49 PM2023-01-15T18:49:00+5:302023-01-15T18:49:17+5:30
Nashik Graduate Election : पक्षविरोधी काम केल्यामुळे हायकमांडने सुधीर तांबे यांच्यावर ही कारवाई केली आहे.
Nashik Graduate Constituency Election : राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यातच नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन मोठा गोंधळ उडाला. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, पण ऐनवेळी त्यांनी फॉर्म न भरल्यानं पक्षानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत काँग्रेस पक्षाने एक पत्रही जारी केलं आहे.
नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसकडून पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणी केली होती. पण, त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. तसेच, फॉर्म भरल्यानंतर भाजपलाही समर्थन देण्याची विनंती केली. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.
हा भाजपचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हाय कमांडला दिली होती. तसेच कारवाईचीही मागणी केली होती. यानंतर आता हायकमांडनं सुधीर तांबेंना निलंबित केलं आहे. काँग्रेस पक्षाने ही कारवाई केल्याचं पत्रही जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित असणार आहेत.