Nashik Graduates Constituency Election : तांबे पिता-पुत्रांवर पक्षाकडून कारवाई होणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्पष्टच बोलले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 06:20 PM2023-01-12T18:20:27+5:302023-01-12T18:31:46+5:30
Nashik Graduates Constituency Election : आज नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवरुन मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.
नाशिक : सध्या महाराष्ट्रात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यादरम्यान, नाशिक (Nashik MLC Election 2023) मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विट पाहायला मिळाला. नाशिक पदवीधर विधान परिषदेसाठी काँग्रेसनं पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. पक्षाकडून सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. पण आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अर्ज दाखल केला. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोलेंना (Nana Patole) सत्यजित तांबेंच्या उमेदवारीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर पटोले म्हणाले की, 'मी सुधीर तांबेंनी दिलेली प्रतिक्रिया ऐकली. त्यांच माझ्याशी कुठलंही बोलणं झालेलं नाही. त्यामुळं सगळ्या गोष्टींची माहिती घेऊनच स्पष्ट बोलेन. तांबे पिता-पुत्रांनी पक्षाला (Congress) अंधारात ठेवून निर्णय घेतला का? याचीही माहिती घेऊ. बाकी, भारतीय जनता पक्षाची लोकं काहीही बोलू शकतात. त्यामुळं मी तुम्हाला सगळी माहिती घेऊन वेळेवर प्रतिक्रिया देईन', अशी टीका त्यांनी केली.
पटोले पुढे म्हणतात की, 'सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म (Independent Candidate) भरल्याचं सांगताय. पण, आमचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांची काय भूमिका होती, त्यांची काय परिस्थिती होती या सगळ्या घटना महत्त्वाच्या आहेत. तिथे आमचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात होते, त्यामुळं नेमकं काय झालं, याची माहिती घेऊनच प्रतिक्रिया देऊ. बाकी जी घटना घडली, ती योग्य नाही', असंही नाना पटोले म्हणाले.
आज नेमकं काय घडलं?
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीनं काँग्रेससाठी जागा सोडली. यानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली आणि आज अर्ज भरण्यासाठी त्यांना एबी फॉर्मही दिला. पण, उमेदवारी अर्ज भरायला गेल्यानंतर ऐनवेळी सुधीर तांबे यांनी माघार घेतली आणि त्यांच्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यांच्या नावाचा एबी फॉर्म आलेला नव्हता, त्यामुळे त्यांनी अपक्ष फॉर्म भरल्याचं सांगण्यात येत आहे.