नाशिक : महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांना महापुराचा फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन घटले असून उन्हाळ कांद्याची साठवणूक केलेल्या नाशिकवर महिनाभरापासून देशाला कांदा पुरविण्याची महत्त्वाची जबाबदारी आली आहे.पुढील दीड महिन्यात नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजी कायम राहण्याची चिन्हे आहेत. कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात माल आणत आहेत, परिणामी भावात काही प्रमाणात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. आॅगस्ट महिन्यात कांद्याचे भाव वाढल्यानंतर केंद्रीय अन्न पुरवठा मंत्रालयाच्या अधिकाºयांनी नाशिकला भेट देऊन स्थिती जाणून घेतली. आसाम, ओडिशा, बिहार, मध्य प्रदेश व गुजरातच्या काही भागाला पुराला तडाखा बसल्याने तेथे कांद्याचे पीक हातचे गेले. त्यामुळे पुरवठ्यासाठी महाराष्ट्रावरच संपूर्ण देशाची भिस्त येऊन पडली.जिल्ह्यात गेल्या महिन्यात २,५०० ते २,७०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव गेले. तर खुल्या बाजारात ग्राहकांच्या हातात कांदा किलोमागे ३५ ते ४० रुपये झाला. जिल्ह्यातून एप्रिल ते जुलै रेल्वेच्या १७२ रेकमधून हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश व बिहारमध्ये माल पाठविण्यात आला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण अवघे ४७ रेक इतके होते.
कांदा पुरविण्याची जबाबदारी नाशिकवर! दीड महिना तेजी राहणार : अनेक राज्यांमध्ये पुरामुळे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 4:16 AM