नाशिक, कोल्हापूर झेडपीत भाजपाला दे धक्का; महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 02:51 AM2020-01-03T02:51:01+5:302020-01-03T07:03:48+5:30
भाजपला सत्तेबाहेर करण्यात महाविकास आघाडीला यश
कोल्हापूर/नाशिक : राज्याच्या सत्तेतून भाजपला हद्दपार केल्यानंतर आता कोल्हापूर आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने भाजपला सत्तेबाहेर करण्यात यश मिळवले. सांगलीत मात्र हा फॉम्युला यशस्वी झाला नाही. शिवसेनेच्या मदतीने अध्यक्षपद राखण्यात भाजपला यश आले.
कोल्हापूर जि. प. च्या अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील (गगनबावडा) उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील (गडहिंग्लज) यांची बहुमताने निवड झाली. गेल्या निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना सत्तेत असल्याचा फायदा घेत ६७ पैकी ४० मते मिळवित भाजपने अध्यक्षपद मिळविले होते; मात्र राज्यातील सत्तांतरानंतर मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील आणि खासदार संजय मंडलिक यांनी पुढाकार घेत जोडण्या लावल्या आणि शिवसेनेच्या सर्व म्हणजेच १० सदस्यांना एकाच छताखाली आणले; त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांना हालचाल करता आली नाही.
नाशिक जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने एकत्र येऊन अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड या दोघांची बिनविरोध निवड केली. गेल्या वेळी सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या उमेदवारांनी संख्याबळ जुळत नसल्याचे पाहून माघार घेतल्याने या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली आहे. महाविकास आघाडीला माकप व अपक्षांनीही पाठिंबा दिला.