नाशिक : अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार असे वाटत असताना तो वाढत आहे. आता या जागेवर भाजपने पुन्हा एकदा दावेदारी केली आहेच; परंतु अजित पवार गटानेदेखील दावेदारी कायम ठेवल्याने उमेदवाराबाबत निर्णय कधी होणार, असा प्रश्न आहे.
नाशिकमध्ये पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान हाेणार असले तरी आता प्रचारासाठी महिनाही उरलेला नाही. दोन आठवड्यांपूर्वी भुजबळ यांचे नाव चर्चेत आल्यानंतर भाजप आणि शिंदेसेना आक्रमक झाली होती. या पक्षाच्या नेत्यांच्या मुंबई आणि दिल्लीत चकरा वाढल्या होत्या. तिढा सुटत नसल्याने आणि भुजबळ यांच्या नावावरूनच बरा-वाईट खल सुरू झाल्याने त्यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे घोषित केले. मात्र, त्यानंतरही उमेदवारी घोषित झालेली नाही. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे.
गोडसे की बोरस्ते? शिंदेसेनेकडून खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते आणि विजय करंजकर यांचेदेखील नाव चर्चेत आहे. गोडसे यांच्यासंदर्भात भाजप अनुकूल नसल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर ग्राउंड रिपोर्ट घेण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे अजय बोरस्ते यांच्या नावाला भाजपची अनुकूलता असल्याचे सांगितले जाते. भाजपकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असून त्यात विद्यमान आमदारही आता तयार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भाजपनेदेखील आता नाशिक, ठाणे या दोनपैकी एक जागा भाजपला द्या, असा आग्रह धरला आहे.
अजित पवार गटही ठाम छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर आता अजित पवार गटाकडून निवृत्ती अरिंगळे आणि आमदार माणिकराव कोकाटे यांचीही निवडणूक लढण्याची तयारी सुरू झाली आहे. भुजबळ नसले तरी ही जागा अजित पवार गटालाच द्यावी, अशी मागणी होत आहे.