नाशिक - मुख्यमंत्री ज्याप्रकारे राज्यभरात काम करतायेत त्यातून अनेकांना पोटदुखी झालीय. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यातून आता ही जागा आपल्याकडून जातेय हे लक्षात आल्यानंतर संजय राऊतांनी आरोप करणं सुरू केले आहे असा टोला शिवसेना नेते उदय सामंत यांनी खासदार संजय राऊतांना लगावला आहे.
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, नाशिकमध्ये उद्योजकांची, व्यापारांची बैठक होती. ज्या आघाडीला प्रतिसाद मिळत नाही त्या नेत्यांना असे आरोप करण्याचे दुरबुद्धी सुचते, काहीजण स्वत: ५-१० हजार इतरांना देतात, त्याचे शुटींग करायचे. ते पैसे महायुती वाटतेय असं करायचे. पराभव समोर दिसायला लागला तर त्याचे खापर कुणावर तरी फोडायचे हे आरोपातून दिसते. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह आम्हा सगळ्यांना बदनाम करणे हा एकमेव कार्यक्रम काहींचा धंदा आहे. या निवडणुकीनंतर ते सर्व राजकीय निस्तनाबूत होणार आहेत याची चिंता करण्याचं कारण नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच राज ठाकरेंचं भाषण तुम्ही पूर्ण ऐकत नाही, त्यातील काही भाग एडिट करता. बाळासाहेबांना ज्यांनी अटक केली त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला होता. तुम्हाला आरोप करण्याचा अधिकार नाही. बाळासाहेबांना अटक झाली त्यांच्यासोबत तुम्ही बसला होता. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांवर आरोप करण्याचा अधिकार नाही असा त्यातील अर्थ आहे असंही उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी, पंकजा मुंडे आणि नितीन गडकरींची सभा आहे. त्यातून सुहास कांदे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. सुहास कांदे हे आमचे आमदार असून ते भारती पवारांना त्यांच्या मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड मिळवून देतील यात शंका नाही असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.