नाशिक : नाशिक महापालिकेच्या माध्यमातून प्रथम सत्तेची अनुभूती घेणाऱ्या मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पाच वर्षांत नवनिर्माण ‘करून दाखविले’चा नारा दिला जात असताना पक्षाच्या ४० पैकी २७ शिलेदारांनी राज यांचे बोट सोडल्याने मनसेला ‘पक्षाघात’ झाला आहे. महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या मनसेला अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे, तर सेना-भाजपाला स्वबळावर सत्तेचे वेध लागले आहेत. सेना-भाजपाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने उभयतांना बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने स्थानिक पातळीवर आघाडीचे संकेत दिले असले तरी प्रतिमा मलीन झालेल्या राष्ट्रवादीसोबत जाण्यावरून कॉँग्रेसमध्येच मतभेद आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरस बघायला मिळेल. पहिली अडीच वर्षे भाजपाबरोबर तर नंतरच्या अडीच वर्षांत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि अपक्ष गट मिळून स्थापन झालेल्या महाआघाडीबरोबर संसार थाटणाऱ्या मनसेची गेल्या पाच वर्षांत कामगिरी यथातथाच राहिली. पाच वर्षांत कधी पूर्णवेळ आयुक्त न देऊन तर कधी कामकाजात हस्तक्षेप करत राज्य सरकारने खोडा घातल्याचा आरोप राज ठाकरे यांनी वारंवार केला. परंतु, राज यांनी निवडणुकीत नाशिकचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे शिवसेना-भाजपाने नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी?नाशिकमध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडीची तयारी ठेवली आहे. परंतु, गेल्या महिनाभरात राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे हे बेनामी रकमेप्रकरणी तर बनावट नोटा छपाईप्रकरणी पक्षाचा माजी पदाधिकारी छबू नागरे हे गजाआड असल्याने राष्ट्रवादीची छबी डागाळली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत जायचे की नाही, याविषयी काँग्रेसमध्ये संभ्रम आहे.
नाशिकमध्ये सत्ताधारी मनसेला ‘पक्षाघात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2017 4:02 AM