नाशिक - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी थंडावली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आता ४ जूनच्या निकालाची वाट पाहत आहेत. त्यातच यंदाच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे मनसे कार्यकर्तेही पक्षाचा एकही उमेदवार नसतानाही महायुतीच्या प्रचारात सक्रीयपणे उतरले होते. आता प्रचार संपल्यामुळे नाशिक इथं मनसेनं कार्यकर्त्यांना मिसळ पार्टीचं आयोजन केले होते. मात्र या मिसळ पार्टीतून कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी कॅमेऱ्यात कैद करण्यात आली. हा व्हिडिओ राज ठाकरेंना पाठवणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे म्हणाले की, प्रचारात कार्यकर्त्यांनी महायुतीच्या प्रचारात प्रचंड तळागाळात उतरून काम केले होते. या कार्यकर्त्यांना त्यांच्या मनातील भावना व्यक्त करायच्या होत्या, कुठेतरी मनमोकळं करायचं होतं त्यासाठी निवडक काही पदाधिकारी, कार्यकर्ते, गेली २० वर्ष मनसेसोबत निष्ठेने काम करतायेत त्यांच्यासाठी मिसळ पार्टीचं आयोजन केले होते. त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या, ज्या अतिशय पूरक आणि पक्षाच्या चौकटीत बसणाऱ्या होत्या. आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या संकल्पना मांडल्या. त्याचं आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. या भावना राजसाहेबांकडे पोहचल्या पाहिजेत त्यादृष्टीने आम्ही हे नियोजन केले होते असं त्यांनी सांगितलं.
तसेच यात नाराजीचा सूर कुठेही नव्हता. राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्ते काम करत असतात. अनेकदा ग्राऊंडवर काम करणारा कार्यकर्ते त्याच्या मनातील भावना वरिष्ठांकडे व्यक्त करताना कमी पडतो, त्यामुळे या कार्यकर्त्यांसाठी आम्ही हे व्यासपीठ बनवलं. हा आमचा प्रयोग यशस्वी झाला. २०० पदाधिकारी, कार्यकर्ते इथं होते. याठिकाणी खेळीमेळीत ही मिसळ पार्टी पार पडली. त्याशिवाय आमच्यात कुठेही गटतट नाही. आम्ही सर्व एकच आहोत. गेल्या २ महिन्यापासून जे विविध उपक्रम झाले. त्यात आम्ही सर्व जोमाने आणि एकत्रित काम करतोय. त्यामुळे कुणीतरी मनसेच गट पडलेत असा गैरसमज पसरवला आहे. आम्ही हे सर्व एकमेकांना सांगूनच केलं होते. पुढच्या टप्प्यात उरलेले पदाधिकारी त्यांचा मेळावाही होणार आहे असंही मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे यांनी सांगितले.
दरम्यान, गटतट हा मनसेत विषय नाही. फक्त राज ठाकरे हा एकच गट आहे. राज ठाकरे जे आदेश देतात त्याचे तंतोतंत पालन मनसे कार्यकर्ते करतात. आमच्यात मतभेद असतील मनभेद नसतील. नाशिकमध्ये नुकताच मनसेचा वर्धापन दिन मेळावा झाला, तो इतक्या ताकदीनं आम्ही सर्वांनी एकत्रित येत संपूर्ण हॉल भरून दाखवला होता हे सगळ्यांनी पाहिले आहे असं सांगत पराग शिंत्रे यांनी पक्षातील अंतर्गत नाराजीवर प्रत्युत्तर दिलं.