नाशिक: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळावा आणि त्यानंतर लगेचच ठाण्यात आलेल्या उत्तरसभेत मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील मुद्दा लावून धरला. मशिदींवरील भोंगे उतरवावेच लागतील, अशी ठाम भूमिका घेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिले आहे. यासह महाविकास आघाडीतील नेत्यांवरही निशाणा साधला आहे. यावरून बऱ्याच उलट-सुलट चर्चा, आरोप-प्रत्यारोप झाले. यातच आता मनसेने केंद्रातील मोदी सरकारला (Modi Govt) या प्रकरणी साद घातली असून, थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनाच पत्र लिहिल्याची माहिती मिळाली आहे.
राज ठाकरेंनी ३ मेपर्यंत राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. नाशिक मनसेने थेट केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना पत्र लिहिले आहे. मशिंदीवरी मशिदींवरील भोंगे उतरविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होण्याबाबत आता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देऊन राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी नाशिक मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पत्राद्वारे केली आहे.
मुस्लिम देशांमध्ये यावर कडक निर्बंध
भोंग्यांमधून अजानच्या घोषणा देणे हा इस्लामचा भाग नसून अनेक मुस्लिम देशांमध्ये यावर कडक निर्बंध आहेत. मशिदींवरील भोंग्यामधून उच्चस्वरात करण्यात येत असलेल्या घोषणांमुळे सार्वजनिक शांततेत भंग होत आहे. शिवाय यामुळे भारतीय राज्यघटनेचे कलम २१ अन्वये दिलेल्या जगण्याच्या अधिकारात ध्वनी प्रदूषणामुळे व्यत्यय येत आहे. हे लक्षात घेत मशिदींवरील भोंगे उतरवावेत असा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
विविध पक्षातील नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्ये
सर्वोच्च न्यायालय ही देशातील सर्वोच्च न्यायसंस्था आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे संपूर्ण देशात तंतोतंत पालन होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी ३ मे २०२२ पर्यत मुदत दिली आहे. राज्यातील सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी राज ठाकरे यांनी दिलेल्या या मुदतीस अकारण धार्मिक रंग देत विविध पक्षातील नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात येत आहेत, असे पत्रात म्हटले आहे.
राज्य सरकारला निर्देश द्यावेत
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत मशिदींवरील भोंगे उतरविण्यात येणार नसल्याचे वक्तव्य करत राज्यातील पोलिस सज्ज आहेत असे म्हटले आहे. हा त्यांनी दिलेला इशारा सर्वोच्च न्यायालयाच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील निकालाचे स्पष्ट उल्लंघन आहे, असे मनसेने आपल्या पत्रात म्हटले आहे. म्हणूनच आता केंद्र सरकारने पुढाकार घेत मशिदींवरील भोंगे तत्काळ उतरविण्यासाठी राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.