नाशिक : भाजपाने साथ सोडल्यानंतर नाशिक महापालिकेची सत्ता मनसेच्या हातून जाण्याची चर्चा फोल ठरवत राज ठाकरे यांनी कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षांच्या मदतीने महापौरपद ताब्यात ठेवले. मनसेचे अशोक मुर्तडक नाशिकचे चौदावे महापौर ठरले. शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा त्यांनी ३१ मतांनी पराभव केला. अपक्ष गटनेते गुरुमितसिंंग बग्गा यांनी उपमहापौरपद पटकावले.शिवसेनेने घोडेबाजार करून मनसे आणि काँग्रेसचे उमेदवार फोडल्याने गुरुवारीच मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्यात आघाडी झाली. महापौरपदासाठी रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. अखेरीस मनसेने महापौरपद आणि अपक्षांनी उपमहापौरपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला. मुर्तडक यांना आघाडी, अपक्ष आणि मनसे यांची एकूण ७५ मते मिळाली, तर सुधाकर बडगुजर यांना सेना-भाजपाची आणि त्यांनी फोडलेल्या मनसे, काँग्रेसच्या चार नगरसेवकांसह ४४ मते पडली. माकपासह ३ नगरसेवक तटस्थ राहिले. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत बग्गा यांना ७५, तर मोरूस्कर यांना ४३ मते मिळाली. राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो. सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. पुढील वर्षीच्या कुंभमेळा कामांना प्राधान्य देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली. मनसेचे प्रदेश सरचिटणीस म्हणाले की, महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने घोडेबाजार मांडला, तसेच सर्वच पक्षांचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच सर्व एकत्र आले. (प्रतिनिधी)
नाशिक महापालिकेवर मनसे‘राज’ कायम!
By admin | Published: September 13, 2014 4:45 AM